
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सर्व सामान्य कामगार व मध्यमवर्गीय नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोच्या काळात माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांच्या प्रयत्नाने सिडको एन-दोन सारा कासलीवाल परिसरात सामाजिक सभागृहाची उभारणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधलेल्या या सभागृहासाठी सरकारच्या अर्धाकोटीचा खर्च झाला. मात्र सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर महापालिकेच्या कारभाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे सर्व बाजुने भिंत कोलमडली आहे. सुशोभिकरणाची जागा कचऱ्याने व्यापली आहे.
सर्व सामान्य कामगार आणि या भागातील मध्यमवर्गीय नागरिकांना लग्नसमारंभ आणि इतर छोट्या सभासमारंभ करण्यासाठी या सभागृहाचा उपयोग व्हावा या उद्दात हेतूने माजी नगरसेवक दामोधर माधवराव शिंदे यांनी नागरीकांच्या वतीने सिडको एन-२ प्रबोधनकार ठाकरेनगर परिसरातील एसटी काॅलनी, सारा-कासलीवाल गार्डन परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी सिडकोच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रशस्त सभागृह बांधण्यात आले आहे. चारही बाजुने सुरक्षाभिंत आणि उर्वरित जागेत खेळण्या, लाॅन सुशोभिकरण, हायमास्ट आणि पथदिवे बसवण्यात आले होते. मात्र आता तेथे सारे काही होत्याचे नव्हते झाले आहे.
खासगी मंगल कार्यालयाचे भाडे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण सिडकोच्या सभागृहाला पसंती देतात. नाममात्र भाडे आकारले जात असल्याने अनेक कामगारांच्या मुलांची लग्ने, तसेच इतर सामाजिक उपक्रम या सभागृहात पार पडतात. मात्र देखभाल व दुरुस्तीकडे संबधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे सध्या या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. सभागृहाच्या दारे-खिडक्या तुटल्या आहेत. चारही बाजुने सुरक्षाभिंत कोलमडलेली आहे. दिवेही बंद आहेत. मैदानाच्या आत-बाहेर कचऱ्याचे ढिग पडले आहेत. आता खुल्या मैदानातील खेळण्याही गायब झाल्या आहेत.वसाहतधारकांना गैरसोयी झाल्याने कुणीही तिकडे फिरकत नाही. याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी जुगारी सभागृहात शिरून पत्ते खेळतात. सभागृहातील वायरिंग, खिडक्या, तसेच पंख्याच्या पात्याची मोडतोड केली असून, भिंतीवरील इलेक्ट्रिक बोर्ड, ट्यूब लाइट चोरून नेल्या आहेत. सभागृहाची स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आयुक्त साहेब याकडेही लक्ष द्या
जालना रस्त्यालगतच असलेल्या एस.टी. काॅलनीते सारा कासलीवाल दरम्यान मधोमध नाला सफाईसाठी कोणीही येत नाहीत. नाल्यात बारा महिने ड्रेनेजचे पाणी वाहते. नाल्याची सुरक्षाभिंत देखील गेल्या दहा वर्षांपासून पडली आहे. मुकुंदवाडी चौकात उघड्यावर मासविक्री होत असल्याने या भागात बेवारसकुत्री रस्त्यावर ठाण मांडून आहेत. ज्येष्ठ नागरिक, स्त्रीया, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. येथील क्षेत्रीय अधिकारी यांना वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जालनारोड ते एकवीरा हाॅस्पिटल या काँक्रिट रस्त्यावर संपुर्ण उतार आहे. रस्ता चांगला असल्याने बेलगाम भरधाव वेगाने वाहने दामटवली जातात. याच मार्गावर मोठी वाहने देखील भरधाव वेगाने जातात. रस्त्याच्या बाजुला मोठी निवासी वसाहत आणि बाजारपेठ असल्याने पादचार्यांची गर्दी असते. या मार्गावर वसाहतीच्या रहदारी मार्गासमोर गतिरोधक बसवने गरजेचे आहे. शिवाय रोड फिनिशिंग पांढरे पट्टे, रेडियम किटकॅट ऑईज आणि झेब्रा क्राॅसिंग देखील गरजेचे आहे. जेनेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.