
मुंबई (Mumbai) : सिडकोची ड्रीम सिटी असलेल्या नवी मुंबईतील खारघर शहरात सेक्टर ३६ मध्ये सिडकोकडून नवीन बांधकाम करण्यासाठी तलाव बुजवून जमीन तयार केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
खारघर मधील सेक्टर 36 मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती बिल्डिंग समोर एक तलाव आहे, त्याच्या जवळून पावसाळी नदी वाहते. सिडकोकडून आता हा तलाव बुजवला जात असल्याचे दिसून येते. सिडकोने खरेतर हा तलाव सुंदर करून या परिसराचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी तलावात भराव घालून तिथे नवी बिल्डिंग बांधली जात आहे, हे अतिशय चुकीचे धोरण असल्याची भावना परिसरातील रहिवाशी व्यक्त करीत आहेत.
या परिसरात स्वत: सिडकोची ७ ते ८ हजार घरांची दोन हौसिंग संकुले आहेत शिवाय खाजगी बांधकाम कंपन्यांचे सुद्धा अनेक मोठ-मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी मोकळ्या जागा, क्रीडांगणे, गार्डन, तलाव आदी सुविधा अपेक्षित असताना सिडकोचे तलाव बुजवून जमीन तयार करण्याचे हे उपराटे धोरण निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.