Nashik
NashikTendernama

Nashik : सिंहस्थासाठी 500 एकर जागा अन् सिंहस्थ परिक्रमेसाठी निधी द्या!

नाशिक (Nashik) : इतिहासात प्रथमच देशाच्या पंतप्रधानांनी गोदाघाटावर येऊन गोदापूजन व आरती केल्याच्या प्रसंगाने भारावलेल्या नाशिकच्या पुरोहित संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवेदन देऊन पंचवटी कॉरिडॉर व सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी पाचशे एकर जागा केंद्र सरकारने खरेदी करावी, अशी मागणी केली. याबरोबरच गोदावरी स्वच्छता, सिंहस्थ परिक्रमा मार्ग, वंशवळ्यांचे संरक्षण करणे आदींबाबतही त्यांनी निवेदनातून मागणी केली आहे.

Nashik
Narendra Modi : 'ब्रॅन्ड नाशिक'साठी केंद्राचा मेगा प्लॅन; 60 कोटींची तरतूद अन् मोदींचा रोड शो

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गोदाघाटावर रामतीर्थ येथे गोदावरी पूजन केले. तसेच गोदावरी आरतीचाही प्रारंभ केला.

रामायणातील उल्लेखानुसार पंचवटी येथे श्रीराम वनवास काळात राहिलेले आहेत. यामुळे पंचवटीतील काळाराम मंदिर भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. येथील श्री काळारामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच देशाचे पंतप्रधान रामतीर्थावर गोदावरी पूजन करण्यासाठी, तसेच श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने पुरोहित संघामध्ये मोठा उत्साह होता.

यावेळी मोदींनी गोदावरीचे विधिवत पूजन केल्यानंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मोदी यांना निवेदन देऊन पंचवटी कॉरिडॉर करण्याची मागणी केली. काशी व उज्जैनप्रमाणे पंचवटी कॉरिडॉर उभारल्यानंतर पंचवटीतील भाविकांची संख्या वाढून धार्मिक पर्यटन वाढीलाचालना मिळू शकणार आहे. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या सिंहस्थासाठी केंद्र सरकारने कायमस्वरुपी ५०० एकर जागा खरेदी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Nashik
Nashik : जल जीवनच्या योजनांसाठी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय; आता ग्रामपंचायतींचे वीजपंपांचे देयक...

तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर यांना जोडण्यासाठी ६० मीटर रुंदीचा सिंहस्थ परिक्रमा मार्ग उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. हा सिहस्थ परिक्रम मार्ग सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी उभारण्याची मागणी त्यांनी केली. हरिद्वार व गयाप्रमाणे नाशिक येथील पुरोहितांकडील वंशावळ्यांच्या संरक्षणासाठी पुरोहितांना स्वतंत्र खोल्या बांधून देण्याचीही त्यांनी मागणी केली. सिंहस्थात साधुग्रामसाठी भूमीअधिग्रहण करण्यासाठी चार हजार कोटींची आवश्यकता असून, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी गोदावरी पूजन केल्यानंतर श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले व महापूजा केली. तसेच तेथे सुरू असलेल्या भजन कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर तपोवनात २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. पुढील तीन दिवस सुरू राहणाऱ्या या महोत्सवासाठी नाशिक शहराचे रुपडे बदलण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी राज्य व केंद्र सरकारने ६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Tendernama
www.tendernama.com