
नागपूर (Nagpur) : अजनी चौकाकडून विमानतळाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलालगतच्या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते आहे. पुलाच्या खालील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (एनएचएआय)ने शक्कल लढविली आहे. डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे चक्क सिमेंटने बुजविण्यात आले आहे. यामुळे, वाहन चालकांचा त्रास वाढल्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
वर्धा रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील या उड्डाण पुलाखाली दोनही बाजूचे रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे अजनी चौकातून हैदराबाद, पुणे, मुंबईकडे एक मार्ग जातो, तर दुसरा मार्ग अजनी चौकाकडून राजधानी दिल्लीकडे जाणारा मार्ग. यामुळे, शहरातील नागरिकांसह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील या मार्गाने असते. यादृष्टीने या रस्त्यांची देखभाल होणे अपेक्षीत आहे. मात्र, एनएचआयने या डांबरी रस्त्याला सिमेंटने बुजवीत ठिगळ लावले आहे. मेट्रोसह महामार्गाला जोडणारा मल्टी-लेयर व्हायाडक्ट प्रकल्प उभारत शहरातील सुविधांमध्ये भर घातल्या गेली.
या प्रकल्पांतर्गत उड्डाणपुलाखालील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. सिमेंट रस्त्यांचे ही कामे अर्धवट असल्याने नागरिकांना आधीच त्रास सहन करावा लागतो आहे. खड्डे बुजविण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या शेजारी जिल्ह्यातील वाहनचालकांसह रुग्णवाहिका देखील शहरामध्ये येण्याचे प्रमाण मोठे आहे. शिवाय, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे घर देखील याच मार्गावर आहे. छत्रपती चौकातून अजनी चौकाकडे त्यांना येणे किंवा जाणे करायचे झाल्यास याच मार्गाचा वापर त्यांच्या ताफ्याला करावा लागतो. त्यांच्या ताफ्यालासुद्धा या तात्पुरत्या डागडुजीचा फटका सहन करावा लागतो आहे. यावरून, एनएचएआयचा कारभार चव्हाट्यावर येतो आहे.