
नागपूर (Nagpur) : एकेकाळी ठेकेदारी करणारे टेकचंद सावरकर आता कामठीचे आमदार झाले आहेत, तर त्यांचे तत्कालीन प्रतिस्पर्धी हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे गावातील एका रस्त्यावरून त्यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने तापेश्वर वैद्य यांच्या सर्कलमधील धानला गावात रस्त्याचे काम मंजूर केले होते. दुसरीकडे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी याच रस्त्यासाठी सावकर यांच्या आमदार निधीतून मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. या वादात रस्त्याचे काम मात्र थांबले आहे.
वैद्य यांनी धानला गावातील रस्त्याचे काम सुरू झाले होते त्याला स्थगिती कशी काय दिली, असा सवाल उपस्थित केला. दुसरीकडे ग्राम पंचायतची मागणी नसतानाही भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्या सूचनेवरून आमदार निधीतून नियोजन अधिकाऱ्यांनी कामास मंजुरी कशी दिली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ कुंभेजकर यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना वैद्य यांच्या शब्दाला वजन होते. माजी मंत्री सुनिल केदार यांचे कट्टर समर्थक असल्याने अधिकारी वैद्य यांचे प्रस्ताव रोखत नव्हते. आता राज्यात शिंदे सेना-भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा कल आता सावरकर यांच्याकडे झुकला आहे. त्यामुळे वादाला सुरूवात झाली आहे.