
नागपूर (Nagpur) ः अनेक वर्षांपासून नवीन नागपूरची संकल्पना रखडली होती. परंतु आता ही संकल्पना अंमलात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत नुकताच नगर विकास विभागाने दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एनएमआरडीए) दिलेला १ हजार ३५३ कोटींच्या विकास कामांना नगर विकास विभागाने मंजुरी दिली. यात एक हजारपेक्षा जास्त किलोमीटरच्या जलवाहिन्या व सिवेज लाईनचे जाळे टाकण्यात येणार आहे. या विकास कामांतून नवीन नागपूरचा पाया रचला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहर चांगलेच वाढले. शहराच्या सिमेवरील बेसा, बेलतरोडी, पिपळा, बहादुरा, कामठी, कोराडी, वाडी, हिंगणा, बुटीबोरीपर्यंत लहान मोठे शहर व खेड्यांचेही आता शहरीकरण झाले. त्यामुळे नवीन नागपूरबाबतही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अऩेक वर्षांपासून असलेली ही चर्चा आता प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाहीत रुपांतरीत होताना दिसत आहे. शहराच्या सभोवताल असलेली खेडी, शहरांच्या नियोजित विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनएमआरडीएची स्थापना केली. जवळपास साडेसातशे खेड्यांचा एनएमआरडीए क्षेत्रात समावेश करण्यात आला.
एनएमआरडीएने या क्षेत्रात बांधकाम नियमावली लागू केली आहे. आता या क्षेत्राच्या विकासासाठीही एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पावले उचलली आहे. नुकताच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी नागपुरात येऊन गेल्या. त्यांनी शहराच्या विकासासंबंधात बैठक घेतली होती. केंद्र सरकारच्या अमृत-२ या योजनेंतर्गत एनएमआरडीएच्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली १३ व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या ११ गावांमध्ये विकास कामे करण्यास मंजुरी दिली. या प्रकल्पाचा लाभ ८१ चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे. या प्रकल्पाअंंतर्गत साऊथ बी सेक्टरमध्ये ५६५.२५ कोटींच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात येणार आहे. एकूण ५६५ किमीचे जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे. यात साथऊ बीमध्ये २२०.९० कोटी तर ईस्ट एमध्ये ३४४.३६ कोटी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय ७८८.८७ कोटींचा सिवेज लाईनचे जाळे पसरविण्याचाही प्रकल्प आहे. दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह ५२२ किमी अंतराच्या सिवेज लाईन तयार करण्यात येणार आहे. यातील साऊथ बीमध्ये २२० तर ईस्ट एमध्ये ३०२ किमीच्या सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे.
प्रकल्पात या गावांचा समावेश
सेक्टर साऊथ बीमध्ये बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली, हुडकेश्वर खुर्द, शंकरपूर, गोटाळपांजरी, वेळाहरी, रुई, वरोडा, पांजरी, किरणापूर, कन्हानळगाव या गावांचा समावेश आहे. ईस्ट एमध्ये पांढुर्णा, तरोडी खुर्द, तरोडी बुजूर्ग, बीडगाव, कापसी खुर्द, पोवारी, अड्याळी, विहिरगाव, गोनी सिम, खरबी, बहादुरा या गावांचा समावेश आहे.