
नागपूर (Nagpur) : रामदासपेठेत नवीन तयार करण्यात आलेले फूटपाथ तोडून कंत्राटदार गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे ड्रेनेज लाईनवरील स्लॅबही तोडण्यात आले असून मोठा खड्डा पडला आहे. वर्दळीच्या या भागातून चालताना तोल जाऊन एखादा व्यक्ती खड्ड्यात पडल्यास त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामदासपेठेतील काचीपुरा पोलिस चौकीजवळचा परिसर वर्दळीचा आहे. येथे चहा, स्टेशनरी, झेरॉक्स आदी दुकाने असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. याच ठिकाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले फूटपाथ रस्ता कंत्राटदाराने खोदून ठेवला आहे. फूटपाथ ड्रेनेज लाईनवर आहे. त्यामुळे फूटपाथ तोडताना ड्रेनेज लाईनला मोठा खड्डा पडला आहे. पाऊस आल्यास ही ड्रेनेज लाईनमधून पाणी वाहते. आता फूटपाथ खोदल्यानंतर ड्रेनेज लाईनमधून वाहत्या पाण्यामुळे हा खड्डा दिसेनासा होतो. परिणामी यात एखादा व्यक्ती पडण्याची शक्यता बळावली आहे. याशिवाय या खड्ड्यातून दुर्गंधी व डास येत असल्याने परिसरातील रहिवाशीही त्रस्त झाले आहेत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदाराकडून वारंवार फूटपाथ तोडले जात असल्याने महापालिकेवरही भुर्दंड बसत आहे. अऩेक दिवसांपासून ही स्थिती कायम असल्याने नागरिकांंनी संताप व्यक्त केला.
आयुक्तांना नागरिकांचे निवेदन
या समस्येकडे लक्ष वेधन्यासाठी राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय संयोजक ॲड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात कांग्रेसचे सोहन कोकोडे, रामप्रसाद चौधरी, रविंद्र भावे, मूलचंद बैसवारे, ओमकार शेंडे, राजेश शाक्य, शुभम खवशी, मुकेश श्रीवास्तव, संदीप राउत, ज्ञानेश्वर भावे, मनीषा कश्यप यांचा समावेश होता.