काळ्या यादीतील 'एमकेसीएल'ला परीक्षांचे टेंडर का? चौकशीचे आदेश

MKCL
MKCLTendernama

नागपूर (Nagpur) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) प्रथम वर्षाच्या परिक्षांचे कंत्राट काळ्या यादीत असलेल्या MKCL ला देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी घेतला. या निर्णयाला स्थानिक आमदारांसह सदस्यांनीही विरोध केला असताना, त्या विरोधाला डावलून कुलगुरुंनी एमकेसीएलला कंत्राट दिले. त्यामुळे याबाबत आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत प्रश्‍न मांडल्यावर या कंत्राटाची चौकशी करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.

MKCL
मुंबईला लुटतेय कोण?; 12000 कोटींच्या घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप

विद्यापीठात २०१६ पर्यंत परीक्षेच्या कामाची जबाबदारी एमकेसीएल देण्यात आली होती. मात्र, केलेल्या कराराप्रमाणे एमकेसीएलद्वारे विद्यापीठाला सेवा देण्यात येत नसल्याचा ठपका एमकेसीएल वर ठेवण्यात आला होता. याबाबत अनेकदा सिनेटच्या बैठकीत सदस्यांनी ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे २०१४ ते २०१६ दरम्यान एमकेसीएलद्वारे बऱ्याच प्रमाणात सेवा देण्यात हयगय होत असल्याने साडेतीन कोटीचे बील विद्यापीठाने थांबवून ठेवले होते. याशिवाय २०१६ पासून परीक्षेच्या कामासाठी आयोजित टेंडर प्रक्रियेत एमकेसीएलला काळ्या यादीतही टाकण्यात आले. याशिवाय जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढून एमकेसीएलला राज्य संचालित कंपनीच्या श्रेणीतून वगळले होते. मात्र, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुन्हा एमकेसीएलला परीक्षेचे कंत्राट देण्याचे ठरविले. दरम्यान त्यांना विद्यापीठाने थांबवून ठेवलेले साडेतीन कोटी रुपयेही परत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सिनेट सदस्यांनी विरोध केला. मात्र, कुलगुरूंनी स्वतः जबाबदारी घेत, त्यांना कंत्राट दिले. तसेच प्रथम वर्षाच्या परीक्षा ते गुणपत्रिका देण्यापर्यंत कामे दिलीत.

MKCL
डॉ. खेमणार कारवाई कराच; ठेकेदार धार्जिणे 'ते' 5 अधिकारी कोण?

गुरुवारी या संदर्भात ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेमध्ये याबाबत प्रश्‍न उपस्थित करीत, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय प्रविण दटके यांनीही एमकेसीएलला पैसे देण्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्यात येत असल्याची बाब उपस्थित केली. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बैठक होणार असून, तत्काळ नोटीस जारी केली जाईल. बैठक आणि तपासात आमदारांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MKCL
जलजीवनच्या 'फेल' विहीरींवर बंधाऱ्यांचा उतारा; चार कोटी निधीतून...

पाच महिन्यांपासून निकालाची प्रतीक्षा
विद्यापीठातील हिवाळी परीक्षांच्या बी.ए. आणि अभियांत्रिकी (बी.ई.) प्रथम सत्राच्या परीक्षांचे निकाल पाच महिने उलटूनही रखडले आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून दुसऱ्या सत्राचे प्रवेशही रखडले आहेत. परीक्षांमध्ये प्रचंड घोळ केल्याचा पूर्वइतिहास पाठीशी असतानाही महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘विश्वास’ टाकल्याचा परिणाम हिवाळी परीक्षेतील विद्यार्थ्यांना भोगावा लागतो आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com