
नागपूर (Nagpur) : मानस चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत सहा पदरी रस्ता प्रस्तावित असून, यासाठी गणेश टेकडी उड्डाणपूल आणि त्या खालाचे दुकाने पाडण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. १४ वर्षांपूर्वी हा पूल महापालिकेने बांधला होता. यामुळे मात्र तब्बल सव्वाशे कोटींची चुराडा आतापर्यंत झाला आहे.
उड्डाणपुलाखाली १६० दुकानदार असून, ४४ जण न्यायालयात गेले आहेत. गणेश टेकडी पूल पाडणे, दुकानदारांना त्यांची अनामत रक्कम आठ टक्के व्याजाने परत करणे, मेट्रो मॉलमध्ये दुकानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. या गणेश टेकडी उड्डाणपूलाखाली १७५ दुकाने असून, ३० वर्षांसाठी महापालिकेने लिजवर दिली होती. परंतु या पुलामुळे रेल्वे स्टेशनवर जाताना वाहतूक कोंडी होत असल्याने पूल पाडून सहा पदरी रस्ता बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या रस्त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निधीही मंजूर केला. परंतु येथील दुकानदार व महापालिकेतील संवाद चांगलाच लांबल्याने पूल पाडण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले होते.
त्यानंतर येथील १६० दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली होती. यातील १२९ जणांनी नोटीसची दखल घेऊन उत्तर दिले. या दुकानदारांची सुनावणी घेण्यात आली. यातील ४७ दुकानदारांनी नुकसान भरपाई स्वरुपात अग्रीम जमा रक्कम व्याजासह परत मागितली तर ३० दुकानदारांनी महामेट्रोच्या मॉलमध्ये जाण्यास उत्सुकता दर्शविली. इतर दुकानदारांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने दखलच घेतली नाही. यातील ४४ जण न्यायालयात गेले. परंतु महापालिकेनेही त्यांच्यासाठी अग्रीम जमा रक्कम व्याजासह परत करणे किंवा मेट्रो मॉलमध्ये दुकाने देण्याचा पर्याय कायम ठेवला आहे. दरम्यान, ज्या दुकानदारांनी महापालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला, त्यांची दुकाने तोडण्यास महापालिकेने सुरुवात केली. १४ वर्षांपूर्वी तयार झाला उड्डाणपूल गणेश टेकडी उड्डाणपूल २००८ मध्ये तयार झाला. त्याचवर्षी दुकानदारांनाही येथे जागा देण्यात आला. तीस वर्षांसाठी दुकाने देण्यात आली होती. परंतु आता शहरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी येथे सहा पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे.