अखेर तीन वर्षानंतर काढला रस्ते बांधकामाचा मुहूर्त!
नागपूर (Nagpur) : मोक्षधाम चौक ते मध्यवर्ती बस स्थानक चौकापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा मुहूर्त तब्बल तीन वर्षानंतर निघाला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
एसटी बसेस, खाजगी बसेस या मार्गावरून प्रामुख्याने धावत असतात. जड वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती. जागोजागी खड्डे पडले होते. काँक्रिटीकरणाच्या यादीत या रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे डांबरीकरणसुद्धा केले जात नव्हते. हा रस्ता सिमेंटचा होणार आहे असे सांगून खड्डेसुद्ध बुजवल्या जात नव्हते. त्यामुळे खड्ड्यातून बसचालक आणि इतर वाहन चालकांना रस्ता शोधावा लागत होते. उशिरा का होईना महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी याची दखल घेतली. तीन वर्षांपासून फाईलवर पडलेली धूळ झटकली आणि रस्त्याच्या कामाचा मुहूर्त जाहीर केला. कामाच्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरु केल्याचे व काम पूर्ण करण्याची दिनांक असलेला फलक लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पर्यायी मार्गाच्या दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेड्सजवळ रोडवर वाहतूक सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक नियुक्त करण्याचेही त्यांनी आदेशात नमुद केले आहे. वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाट्या, कोनस, बॅरिकेड्स दोरी, रिफलेक्टीव्ह जॅकेटस, एलएडी बॅटन, ब्लिकर्स, इत्यादी साधनाचा वापर करावा. कामादरम्यान निघणारी माती, गिट्टी, पिवर ब्लॉक वगैरे रस्त्यावर टाकू नये. त्याकरीता विशेष व्यवस्था करण्यात यावी. काम झाल्यानंतर बांधकाम दरम्याण पर्यायी मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे बुजवुन त्यावर सिमेंटीकरण, डांबरीकरणासह रोड पूर्ववत करावा, असेही आदेश त्यांनी कंत्राटदारांना दिले आहे.
कंत्राटदाराला इशारा
पर्यायी मार्गाबाबत, वळण मार्ग आदीची माहिती असलेले फलक लावण्यात यावे. रात्रीचे वेळी वाहनचालकंना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेड्सवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना करतानाच अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार जबाबदार राहतील, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

