ठेकेदाराला वाचवण्यासाठी भाजप आमदाराची मृत कुटुंबियांना 5 लाख मदत?

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : खड्यात पडून एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर कळमना परिसरातील रेल्वे मार्गाच्या खालून जाणारा डिप्टी सिग्नल ते शांतीनगर या भुयारी मार्गाची वेगळीच काहाणी समोर आली आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मृतकाच्या कुटुंबीयास पाच लाखांची मदत देऊन शांत केले असले तरी या भुयारी मार्गाला रेल्वेची अद्याप परवानगी नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता खोदलेला भुयारी मार्ग बंद करायची वेळ आली आहे.

Nagpur
मुंबई महापालिकेची 3 हॉस्पिटलसाठी टेंडर; 'या' भागातील रुग्णांना लाभ

कळमना ते नागपूर या दरम्यान रेल्‍वे फाटकावर उभे राहावे लागत असल्याने येथून भुयारी मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी याकरिता ७५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकरिता टेंडर काढले होते. त्यानुसार भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. येथे मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात सर्व खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहे. कामगाराचा एक मुलाचा खेळता खेळता खड्ड्यात पडून मृत्यू झाला. कामगारांचा रोष उफाळून येऊ नये याकरिता लगेच मुलाच्या कुटुंबात पाच लाखांची मदत करण्यात आली. तसेच संबंधित कंत्राटदारास तंबी देण्यात आली. मात्र हा सर्व प्रकार कंत्राटदारास वाचवण्याचा असल्याचे समोर येऊ लागले आहे. वर्षभरापासून या भुयारी मार्गाचे काम थांबले आहे. रेल्वेने अद्याप येथे खोदकामास परवानगी दिली नाही. त्यामुळे कंटाळून कंत्राटदाराने काम सोडून दिले होते.

Nagpur
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; पाहणीसाठी खुद्द रेल्वेमंत्री 'बीकेसी'त

अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेल्या या खड्ड्याभोवती सुरक्षेसंबंधी कुठलाही फलक किंवा सावधतेसाठी कुंपण केले नाही. संबंधित बेजबाबदार अधिकारी, कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधींविरोधात परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सात ते आठ फूट खोल या खोदकामाभोवती सुरक्षेसंबंधी कुठलेही फलक लावले नाही किंवा तात्पुरते संरक्षक कठडेही लावण्याकडे अधिकारी, कंत्राटदाराने दुर्लक्ष केले. या खड्ड्यात लहान मुले पडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. परंतु याकडे गांभीर्याने न पाहिल्याने दोन दिवसांपूर्वी पृथ्वी मार्कंडे हा बारा वर्षाचा मुलगा या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. कंत्राटदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी या त्रिकुटाच्या उदासिनतेमुळेच पृथ्वीचा जीव गेल्याचा आरोप जनलोकपाल संघर्ष समितिचे संयोजक राजेश पौनीकर यांनी केला आहे. घटनेच्या चार दिवसानंतरही येथे कुठलेही सुरक्षेचे उपाय केले नाहीत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com