भुजबळांच्या पाठबळाने ब्रह्मगिरी वाचणार का?

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalTendernama

नाशिक (Nashik) : दक्षिण भारताची जीवन वाहिनी असलेल्या गोदावरीचे व मुंबईला पाणी पुरवणाऱ्या वैतरणा या दोन नद्यांचे उगमस्थान असलेला त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वत सध्या उत्खननाच्या विळख्यात सापडला आहे. दरवर्षी कोणीतरी ब्रह्मगिरीला नख लावतो आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना धावाधाव करून अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या करून काम बंद पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यावेळी माजी पालकमंत्री व ज्येष्ठनेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे व ब्रह्मगिरीचे उत्खनन याबाबत थेट विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केले. तसेच त्यानंतर ब्रह्मगिरीच्या उत्खनानाची पाहणी करून ब्रह्मगिरी परिसर नो डेव्हलपमेंय व इको सेंन्सिटिव्ह झोन जाहीर करण्याची मागणी केली आहे. ब्रह्मगिरी बचाव मोहिमेला भुजबळांचे बळ लाभल्यामुळे ब्रह्मगिरी पर्वत परिसराच्या पर्यावरणाचे रक्षण का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करताना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जात आहेत, ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध स्वरूपात बांधकाम केलं जाताय यामुळे पर्यावरणाचे परिणामी सर्वच घटकांचे नुकसान होत असल्याने पर्यावरणवादी कार्यकर्ते अशा अवैध उत्खननास विरोध करीत असतात. मात्र, प्रत्येकवेळी नवीन मुद्दा उपस्थित होत असतो. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी खासगी जमिनीवर विकासकामे करण्याच्या नावाखाली ब्रह्मगिरीचे उत्खनन केले जाते. विशेष म्हणजे यासाठी सरकारी निधीचा वापर केला जात आहे. कालिका मंदिराकडे जाण्याच्या नावाखाली नगरविकास मंत्रालयाकडून निधी आणून नगरपालिकेच्या माध्यमातून खासगी जागा मालकाची परवानगी न घेताच रस्ता तयार करणे व अहल्या नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू केले. त्याला विरोध करून ते बंद पाडल्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसाच प्रकार गंगाद्वारकडे जाण्याच्या मार्गावर म्हाळसा मंदिरासाठी भक्तनिवास उभारण्याचे काम सुरू आहे. ही जागा अटल आखाड्याची असून आखाड्याची परवानगी न घेताच सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. सरकारी अधिकारीच ब्रह्मगिरीच्या उत्खननास प्रोत्साहन देत असल्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाच्या ब्रह्मगिरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आहे.

या प्रश्नाची दखल घेत छगन भुजबळ यांनी नागपूर येथील अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात उत्खनन करण्यात येणार नाही तसेच उत्खनन केलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन संपल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष ब्रम्हगिरी परिसरात पाहणी केली. गोदावरी व वैतरणा या महत्वाच्या नद्यांचे उगमस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रम्हगिरी पर्वत पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून पशुपक्षाचे स्थलांतर होत आहे, या उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण होणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रम्हगिरी संरक्षणासाठी कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ईको सेन्सिटिव्ह क्षेत्र जाहीर करावे, तसेच परिसरातील जैव संपदेचे जतन केले जावे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरातील मनमोहक वातारणात व सृष्टीसौंदर्याला या उत्खननामुळे बाधा निर्माण झाल्यामुळे येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या परिसरात नो डेव्हलमेंट व पश्चिम घाटाच्या धर्तीवर इको सेनसिटिव्ह झोन जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भुजबळ आता विरोधात असल्याने ते सरकारविरोधात भूमिका म्हणून पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या भूमिकेने ब्रह्मगिरी वाचण्यास मदत होणार की नाही हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com