
नाशिक (Nashik) : जिल्हा नियोजन समितीतून (DPC) मागील आर्थिक वर्षात अधिक निधी दिलेल्या तालुक्यांना यंदाच्या नियोजनातून निधी द्यायचा नाही, अशी भूमिका पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच जाहीर केली होती. मात्र, त्यांच्या या नियमाचा फटका त्यांच्याच पक्षाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या नांदगाव तालुक्याला बसला. बांधकाम विभागाने नांदगाव तालुक्याला 3054 या लेखशीर्षमधून एक रुपयाचेही नियोजन केले नव्हते. मात्र, आमदार कांदे यांची नाराजी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या संमतीने बांधकाम विभाग क्रमांक तीनने त्यांना 70 लाख रुपयांचा निधी देऊन चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पालकमंत्री उदार झाले व हाती 70 लाख दिले, अशी चर्चा होत आहे.
जिल्हा नियोजन समितीने मागील आर्थिक वर्षात कमी निधी दिला, असा आरोप करीत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्या वादावर तोडगा काढत भुजबळ यांच्या संमतीने जिल्हा नियोजन समितीने पुनर्नियोजनमधून नांदगाव मतदार संघात 72 कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र, त्यासाठी प्रत्यक्षात खूप कमी निधी दिला, यामुळे त्या अपुऱ्या निधीचे यंदाच्या वर्षात दायित्व वाढले. पालकमंत्री भुसे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर मागील वर्षी निधीचे असमान वितरण झाले असून मागील वर्षी अधिक निधी दिलेल्या तालुक्यांना यंदा निधी देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना या भूमिकेचा फटका बसणार, असे मानले जात होते. प्रत्यक्षात या धोरणाचा फटका नांदगाव मतदार संघाला बसला.
या वर्षी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग तीनला मंजूर नियतव्यातून 15 कोटींचा निधी केवळ नांदगाव तालुक्यातील प्रलंबित कामांसाठी द्यावा लागला. यामुळे नांदगावला यंदाच्या नियमित कामांमधून कमी निधी देण्यात आला. आमदार कांदे यांना याचा अंदाज आधीच आल्याने त्यांनी आधीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन सर्वाना समान निधी देण्याची मागणी केली. असे असतानाही बांधकाम विभाग तीनच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी त्यांच्याकडील उपलब्ध 31.60 कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्यक्ष 19.75 कोटी रुपयांचे नियोजन केले. यात, आमदार कांदे यांना 3054 या लेखाशीर्षातून एक रुपयाही नांदगाव तालुक्याला देण्यात आला नव्हता. तसेच ५०५४ या लेखशीर्षातूनही देय असलेल्या निधीच्या केवळ 87 टक्के निधी मंजूर केला.
यामुळे कांदे यांना कमी निधी मिळाल्यास त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती. यामुळे निधी वाटप होताच पालकमंत्र्यांनी आमदार कांदे यांना दुसऱ्या टप्प्यात निधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. त्यानुसार बांधकाम तीनने उर्वरित निधीतून नांदगाव तालुक्यासाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे. इतर तालुक्यांना प्रत्येकी अडीच ते तीन कोटी रुपये निधी दिला असताना नांदगावला 3054 मधून 70 लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे आमदार या निधीवर समाधान मानतात की आणखी निधीचा आग्रह धरतात, याबाबत उत्सुकता आहे.