तीच चूक पुन्हा; नाशकात पाइप लाइनसाठी परत रस्ते खोदण्यास परवानगी

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : यंदाच्या पावसाळ्यात गुणवत्ताअभावी रस्त्यांची अक्षरश: वाट लागली असताना आता महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला (MNGL) जवळपास २०५ किलोमीटर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदकामास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे (Potholes) अद्याप बुजवून झाले नसताना, पुढच्या एप्रिलपर्यंत नागरिकांना या खोदलेल्या रस्त्यांमधून वाट शोधावी लागणार आहे.

नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या माध्यमातून घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात हे काम बंद होते. पावसाळा संपल्यानंतर पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक शहरांमधील रस्त्यांचे कौतुक राज्यभर केले जात होते. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने रस्त्यांची खोदाई सुरू केल्यापासून रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते खोदताना महापालिकेकडे तोडफोड फी जमा करण्यात आली असली तरी रस्त्यांवर खोदकाम करताना बेपर्वाई दाखवली जाते. रस्ते खोदून ठेवले जातात व काम झाल्यानंतर मातीचा ढिगारा तसाच ठेवला जातो. केबल तुटल्यानंतर दुरुस्त केल्या जात नाहीत. खोदलेल्या भागावरच डांबर ओतून रस्त्याची डागडुजी केल्याचा दिखावा केला जातो. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होतो. पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी सुरू झाली आहे, मात्र एकीकडे डागडुजी होत असताना दुसरीकडे पुन्हा एमएनजीएल कंपनीला रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीती व चीड अशा भावना निर्माण झाल्या आहेत. 

असे होणार खोदकाम

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला ३८ ठिकाणी गॅस पाइपलाइनसाठी खोदकामाला परवानगी दिली आहे. एकूण २०५ किलोमीटर पैकी १६५ किलोमीटर लांबीची खोदाई झाली आहे. सध्या पूर्व विभागात ४६.९५२ किलोमीटर पैकी ३५.७ किलोमीटर खोदाई पूर्ण झाली आहे. पश्चिम विभागात ५.५८ किलोमीटर लांबीची खोदाई करण्यात आली आहे. पंचवटी विभागात ११.७८२ किलोमीटरची खोदाई करण्यास परवानगी देण्यात आली. त्यापैकी ११.३ किलोमीटरची खोदाई झाली आहे. सातपूर विभागात ४४.९२४ किलोमीटर पैकी ३८.९ किलोमीटर लांबीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. नाशिक रोड विभागात ४८.०६ किलोमीटर रस्ते खोदले जाणार आहेत. त्यापैकी ३७.९ किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले आहेत. सिडको विभागात ४७.१८१ किलोमीटर पैकी ३८. ४५० किलोमीटर रस्त्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com