
नाशिक (Nashik) : नंदूरबार (Nandurbar) तालुक्यातील गुजरात (Gujrat) राज्याच्या हद्दीवर असलेला धानोरा येथील रंका नदीवरील पूल गुरुवारी (ता. २९) सकाळी अचानक कोसळला. महाराष्ट्र व गुजरात यांना जोडणारा पूल कोसळला तेव्हा सुदैवाने त्यावरून वाहन जात नव्हते. हा पूल ४५ वर्षांपूर्वी बांधलेला आहे. पूल कोसळल्याने मार्गावरील गुजरात व महाराष्ट्राची वाहतूक ठप्प झाली आहे. पूल कोसळल्याची माहिती समजताच तहसीलदार भाऊसाहेब थोरात घटनास्थळ पोहोचले.
या पुलाची मुदत संपली होती, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. हा पूल चहुबाजूंनी खचला होता. मात्र, संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. तसेच या महामार्गावरून प्रामुख्याने अवजड वाहतूक होत असते. तसेच मागील तीन-चार महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाचीही यात भर पडून पूल आणखी कमकुवत झाला. यामुळे मुदत व क्षमता संपलेला पूल कोसळल्याचे सांगितले जात आहे. पूल कोसळेपर्यंत याकडे दर्लक्ष कसे करण्यात आले? या पुलाचे स्ट्रकचरल ऑडिट झाले होते का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.