छगन भुजबळांसाठी महत्त्वाच्या 'या' कामाला येवल्यातूनच विरोध

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalTendernama

नाशिक (Nashik) : पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणास येवला तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. या 162 किमी लांबीच्या कालव्याच्या अस्तरीकरणास नुकतेच 115 कोटी रुपये जलसंपदा विभागाने मंजूर केले आहेत. छगन भुजबळ यांच्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पावरून आता राजकारण सुरू झाले आहे.

Chhagan Bhujbal
अबब! नाशिकमध्ये होणार 42 मजली मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब

येवला तालुक्यातील डोंगरगाव व चांदवड तालुक्यातील दरसवाडी या साठवण बंधाऱ्यांसह चांदवड, येवला तालुक्यातील इतर बंधाऱ्यांना पुणेगावमधून पूरपाणी आणण्याची ही योजना 1972 मध्ये जाहीर केली. त्यानंतर काही ठिकाणी कालव्याचे काम वगळले तर इतर ठिकाणी काहीही प्रगती झाली नाही. येवल्याच्या अनेक निवडणुका केवळ याच मुद्द्यावर लढल्या गेल्या. अखेर 2004 मध्ये छगन भुजबळ येवल्याचे आमदार झाल्यानंतर या प्रकल्पास गती आली. पुणेगाव धरणातील पाणी या कालव्यास येऊ शकणार नसल्याने भुजबळ यांनी सुरगाणा तालुक्यातील दिवसाने येथे बंधारा बांधून ते पाणी मांजरपाडा बोगद्यातून पुणेगाव येथे आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला. प्रकल्प 2018 मध्ये पूर्ण झाल्यानंतर 2019 मध्ये पहिल्यांदा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात आले. त्यावर्षी पुणेगावमधून सोडलेल्या पुरपाण्याने चांदवडमधील दरसवाडी धरण भरले, पण त्यापूढे येवला तालुक्यात कालव्याची कामे झालेली नसल्याने ते पाणी येवला तालुक्यातील धरणांत येऊ शकले नाही. पहिल्याच चाचणीत या कालव्याच्या अनेक त्रुटी समोर आल्या. यामुळे कालव्याची वहन क्षमता 120 क्यूसेक वरून 200 क्यूसेक करण्यात आली. येवला तालुक्यात कालव्याची अपुरी कामे पूर्ण करण्यात आली, पण 2020 व 2021 या दोन वर्षांमध्ये चांगला पाऊस न झाल्यामुळे या कालव्यातून पूर पाणी आले नाही. यावर्षी चांगला पाऊस होऊन 14 जुलैस कालव्यातून पाणी सोडले. दरसवाडी धरण भरून येवला तालुक्यात पाणी गेले, पण तेथून डोंगरगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचू शकले नाही.

दरम्यान पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्यातून गळती मोठया प्रमाणावर होत असल्याने पाणी पोहोचण्यास 60 दिवस लागतील व वहन नुकसानीमुळे ही योजना व्यवहार्य होणार नाही हे लक्षात आल्यामुळे या कालव्याचे अस्तरीकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यासाठी नुकतीच पुणेगाव कालवा अस्तरीकरण करण्यासाठी 115 कोटींची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर आमदार छगन भुजबळ यांनी या निधीतून कामे झाल्यांनातर पुढील वर्षी डोंगरगाव बंधाऱ्यात पाणी येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Chhagan Bhujbal
टोल भरून करा 'या' मृत्यूच्या महामार्गावरून प्रवास; ब्लॅकस्पॉटमुळे

यानंतर येवल्यातील भुजबळ विरोधकांनी या प्रकल्पाविषयी शंका घेण्यास सुरवात केली आहे. माणिकराव शिंदे यांनी पत्रक काढून टीका केली आहे. त्यांनी प्रामुख्याने मांजरपाडा प्रकल्पातून निर्मिती झालेल्या पाण्यापैकी येवला तालुक्याला किती पाणी मिळणार आहे, येवला तालुक्यातील डोंगरगाव व इतर 35 बंधाऱ्यांचा पूर्वी या प्रकल्पात समावेश होता. मधल्या काळात अनेक नवीन बंधारे झाले आहेत. त्यांना या कालव्याचे पूरपाणी मिळणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच पुणेगाव कालव्याचे अस्तरीकरण होणे ही चांगली बाब असली तरी येवला तालुक्यातील कातरणी पासून पुढे अस्तरीकरण करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अस्तरीकरण केल्यास कालव्यालगतच्या विहिरींना त्या पाण्याचा उपयोग होणार नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी या अस्तरीकरणास विरोध करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कालव्यास येवल्यात अस्तरीकरण होणार नसल्यास चांदवड तालुक्यातही विरोध होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात पुणेगाव कालव्याचे अस्तरीकरण हा मुद्दा वादाचा विषय ठरण्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com