
नाशिक (Nashik) : कोविड (Covid 19) काळात नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाने 75 कोटींची उपकरणे खरेदी केली होती. या खरेदीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी ठपका ठेवत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार 75 कोटींच्या खरेदीच्या चौकशीस 21 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. चौकशी समितीत पाच सदस्य असून ते चार-पाच दिवसांत अहवाल देणार आहेत.
कोविड काळात आरोग्य विभागाकडून नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास 75 कोटींची उपकरण खरेदी केली. त्यात प्रामुख्याने बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन टॅंक, शस्त्रक्रियेची साधने यासह इतर उपकरणांची खरेदी करण्यात आली. कोरोना काळात तातडीने खरेदी करायची असल्याने सरकारकडून खरेदी नियमांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. मात्र, या शिथिलतेचा गैरफायदा उठवत जिल्हा रुग्णालयात अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले. त्याचवेळी या खरेदी विषयी संशय व्यक्त करण्यात येऊन तक्रारीही झाल्या होत्या. या खरेदीतून शस्त्रक्रियेची उपकरणे खरेदी केली होती. मात्र, त्या उपकरणांमध्ये दोष आढळला. तसेच केंद्रीय मंत्र्यांकडेही तक्रारी गेल्या होत्या. यामुळे आरोग्य सचिव डॉ. विभा चहल यांनी या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य उपसंचालक कार्यालयाने समिती गठीत केली असून तिचा अहवाल चार-पाच दिवसांत येणे अपेक्षित आहे. दरम्यान याच कार्यालयाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र चौकशीसाठीही एक समिती स्थापन केली आहे.
जिल्हा परिषदेच्या औषध खरेदीची चौकशी व्हावी
जिल्हा रुग्णालयात कोविड काळात केलेल्या खरेदीची चौकशी सुरू असल्याने त्याच काळात नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जवळपास 25 कोटींची खरेदी केलेली आहे. या खरेदीविषयी त्यावेळी सर्वसाधारण सभांमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आले होते. आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे काहीवेळा फेर टेंडर, जीईएम पोर्टलवरून खरेदी करावी लागली होती. मागील वर्षी तर एका सर्वसाधारण सभेत केवळ औषध खरेदी हाच चर्चेचा मुद्दा होता. त्यावेळी आरोग्य विभागाकडून दर निश्चित करताना जिल्हा रुग्णालयानेही याच दराने खरेदी केली आहे, असे उत्तर दिले जात होते. जिल्हा रुग्णालयाचे दर वादात सापडून त्यांची चौकशी होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोविड काळात केलेल्या खरेदीचीही चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते डॉ. आत्माराम कुंभारडे यांनी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.