
पुणे (Pune): जमिनीचे वाढलेले भाव, महागलेले बांधकाम साहित्य, शहरात उपलब्ध असलेल्या विविध पायाभूत सुविधांमुळे सातत्याने वाढत असलेली मागणी यामुळे पुण्यात घराचे स्वप्न महागले आहे.
२०२२च्या तुलनेत पुण्यातील सदनिकेची सरासरी किंमत २७ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा पुण्यातील सदनिकांची सरासरी किंमत ही ७५ लाखांच्या घरात पोचली आहे. मात्र, त्यानंतरही देशातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत परवडणारी घरे पुण्यात उपलब्ध असल्याने येथील बांधकाम क्षेत्र आजही तेजीत आहे.
२०२१ मध्ये पुण्याचा बांधकाम क्षेत्राचा आकार ३६ हजार कोटी रुपये होता. त्यानंतर २०२२ मध्ये सदनिकेची सरासरी किंमत ही ६० लाखांच्या घरात होती. २०२३-२०२४ मध्ये या क्षेत्रात पुन्हा तेजी आल्याने २०२४ मधील उलाढाल ६५ हजार कोटी रुपयांवर पोचली होती.
२०२५ च्या पहिल्या सहामाहीत पुणे मेट्रोपॉलिटन क्षेत्रात ४४ हजार सदनिकांची विक्री झाली असून, त्यातून ३२ हजार ८०० कोटींची उलाढाल झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या हंगामात हे आकडे गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असा अंदाज ‘क्रेडाई पुणे’ने व्यक्त केला आहे. ‘क्रेडाई पुणे’ आणि ‘सीआरई मॅट्रिक्स’ यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मध्ये बांधकाम क्षेत्राच्या उलाढालीसह विविध माहिती मांडण्यात आली आहे.
ऑफिस मार्केटमध्ये भरभराट
पुणे देशात कार्यालयीन जागांच्या विक्रीत पाचव्या क्रमांकावर आहे. पुण्याचे कार्यालयीन क्षेत्र १०० मिलियन चौरस फूट क्लबमध्ये समाविष्ट झाला असून २०३० पर्यंत हे क्षेत्र १५० मिलियन चौरसपर्यंत पोचेल असा अंदाज आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत ऑफिस रेंटल्समध्ये जवळपास ८.८ टक्के वाढ झाली आहे. त्यातून अधिक नोकऱ्या निर्माण होतील, ज्यामुळे खरेदी क्षमता वाढेल आणि घरांची मागणीही वाढेल.
शहर आणि सदनिकेची सरासरी किंमत
पुणे - ७५ लाख रुपये
हैदराबाद -१.८४ कोटी रुपये
बंगळूर-१.६१ कोटी रुपये
मुंबई -२.२६ कोटी रुपये
सरासरी किंमत वाढण्यामागील कारणे
बांधकाम साहित्याचे वाढलेले भाव
जमिनीच्या किमती सातत्याने वाढत आहेत
नोकरी व करिअर संधी, शैक्षणिक संस्था
वाढते आयटी आणि औद्योगिक क्षेत्र
घराच्या खरेदीबाबत नागरिकांची बदललेली पसंती
महागड्या सदनिका घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे
आयटी व कार्यालयीन जागांची मागणी असल्याने खरेदी क्षमता वाढली
पायाभूत सुविधांची उपलब्धता
आगामी विमानतळ, मेट्रो आणि चांगली कनेक्टिव्हिटी
परवडणाऱ्या घरांची उपलब्धता
शहरापासून जवळ असलेली पर्यटन स्थळे
चांगली जीवनशैली आणि मनोरंजनाचे विविध पर्याय
गेल्या काही वर्षांत झालेली उलाढाल
वर्ष - उलाढाल (कोटी रुपयांत)
२०२१ - ३६,०५३
२०२२ - ४९,१४१
२०२३ - ५९,४८०
२०२४०- ६५,०११
२०२५ (जूनअखेर)- ३२,८१७