

मुंबई (Mumbai): 'विकसित महाराष्ट्र 2047'च्या दिशेने राज्याचा प्रवास वेगात करण्यासाठी प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर देत सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश CM Devendra Fadnavis यांनी दिले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधत ‘विकसित महाराष्ट्र 2047’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासनाने अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रादेशिक तफावत कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करण्याचे निर्देश दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. राज्याचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असले तरी 11 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना ‘विकासाचे इंजिन’ मानून विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
या अनुषंगाने राज्यात 10 आकांक्षी जिल्हे आणि 174 आकांक्षी तालुके निश्चित करण्यात आले असून सूक्ष्म पातळीवर विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे केवळ राज्यस्तरावर नव्हे, तर तालुका स्तरावरही विकासाचे मापदंड सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर यावा, यासाठी विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. वित्त विभागाने 30 एप्रिलपर्यंत सर्व प्रकल्पांचे आर्थिक मूल्यमापन पूर्ण करावे, तर नियोजन विभागाने मार्गदर्शक सूचना तातडीने जाहीर कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले.
निधी उभारणीसाठी केंद्र व राज्य योजना, वित्त आयोग, जिल्हा योजना तसेच बाह्य आणि अंतर्गत कर्ज यांचे समन्वित नियोजन करण्यावर भर देण्यात आला. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) आणि जमीन मूल्य धोरणांचा वापर करून पर्यायी निधी स्रोतांचा प्रभावी वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले.
याशिवाय ‘Ease of Doing Business’ सुधारण्यावर विशेष भर देत खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि उपभोग वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध विभागांमधील समन्वय वाढवून कामकाज अधिक कार्यक्षम करण्यावरही भर देण्यात आला.
राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आता अंमलबजावणी टप्प्यावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
असा आहे प्लॅन...
‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी कृती आराखडा
11 जिल्ह्यांवर विशेष लक्ष
10 आकांक्षी जिल्हे, 174 तालुके निश्चित
PPP आणि पर्यायी निधी स्रोतांवर भर
Ease of Doing Business सुधारण्याचे निर्देश