Trimbakeshwar Administrative Building: त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; 66 कोटींच्या 5 मजली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि ग्रामविकास विभागाच्या निधीतून साकारणार राज्यातील तालुका पातळीवरील पहिली सर्वात मोठी इमारत; दर्शन पथासाठी सर्व शासकीय कार्यालये येणार एकाच छताखाली
राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis, Maharashtra Government, MantralayaTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर शहराच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वरमधील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ६६ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ५ मजली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तालुका पातळीवर उभारली जाणारी ही राज्यातील पहिलीच एवढ्या मोठ्या आकाराची भव्य आणि सर्वसुविधायुक्त इमारत ठरणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
राज्यातील 6 तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट; भीमाशंकर, देहू आणि परळी वैजनाथसाठी 993 कोटींचा निधी

निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कोट्यवधी रुपयांची विकासकामे वेगात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा देण्यासोबतच शासकीय कारभारात गतिमानता आणण्यासाठी ६६ कोटी रुपयांच्या भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या नव्या पाच मजली मध्यवर्ती इमारतीचे भूमिपूजन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

३५० कोटींच्या दर्शन पथासाठी कार्यालयांचे स्थलांतर
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या काळात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी तब्बल ३५० कोटी रुपये खर्चाचा भव्य दर्शन पथ (Darshan Path) उभारण्यात येत आहे. या दर्शन पथाच्या कामाच्या नियोजनामध्ये सध्या कार्यरत असलेले त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि भूमी अभिलेख कार्यालय या शासकीय इमारतींची जागा बाधित होत होती. या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून पेगलवाडी येथील २००१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra News: राज्यातील 'ते' 13 हजार अधिकारी, कर्मचारी होणार हायटेक

या इमारतीच्या उभारणीसाठी महसूल विभागाने पेगलवाडी येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. एकूण १०,४०१ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीसाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाने आधीच ४६ कोटी ५७ लाख रुपयांच्या तरतुदीला आणि ग्रामविकास विभागाने १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

अशी असणार ५ मजली मध्यवर्ती इमारत (इमारत आराखडा):

  • तळमजला (Ground Floor): अत्याधुनिक व प्रशस्त वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था.

  • पहिला मजला: तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ आणि पंचायत समिती कार्यालय.

  • दुसरा मजला: उपकोषगार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २ आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचे (SDO) कॅम्प कार्यालय.

  • तिसरा मजला: भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग आणि पंचायत समितीचा उर्वरित भाग.

  • चौथा मजला: कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालय, मोठे सभागृह आणि भांडार कार्यालय.

  • पाचवा मजला: भव्य बैठक कक्ष (VVIP मीटिंग हॉल).

राज्य सरकारची मोठी घोषणा
मंत्रालयातच नियमांना हरताळ? मुख्य अभियंत्यांचे अधिकार थेट सचिवांच्या खिशात

वर्षभरात त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार
या प्रसंगी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "त्र्यंबकेश्वरचा जागतिक नावलौकिक लक्षात घेता राज्य शासन कुंभमेळ्यासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही. केवळ भव्य प्रशासकीय इमारतच नाही, तर भाविकांसाठी नवीन घाट, प्रशस्त रस्ते आणि दर्शन पथाचे काम वर्षभरात पूर्ण केले जाईल. गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, यादृष्टीने विशेष जलशुद्धीकरण आणि पाणी नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे."

या भूमिपूजन सोहळ्याला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते, माजी महापौर हिमगौरी आडके-आहेर, माजी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रास्ताविकात इमारतीची तांत्रिक माहिती दिली.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Uday Samant Announcement: लंडनमध्ये उभारणार 'छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषा वैश्विक केंद्र'

Key Points Summary

  • त्र्यंबकेश्वर येथे ६६ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या पाच मजली नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन.

  • कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.

  • ३५० कोटींच्या भव्य दर्शन पथासाठी सध्याच्या सरकारी इमारतींचे स्थलांतर केले जाणार.

  • पेगलवाडी येथील २००१ चौरस मीटर जागेवर १०,४०१ चौरस मीटरचे एकूण बांधकाम होणार.

  • कुंभमेळा विकास प्राधिकरणाकडून ४६.५७ कोटी आणि ग्रामविकास विभागाकडून १४.५० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता.

  • सर्व शासकीय कार्यालये (तहसीलदार, पंचायत समिती, भूमी अभिलेख, कृषी, उपकोषगार इ.) एकाच छताखाली येणार.

  • तालुका पातळीवर उभारली जाणारी ही राज्यातील पहिली सर्वात मोठी सर्वसुविधायुक्त इमारत ठरणार.

Tendernama
www.tendernama.com