.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai): राज्यातील रस्ते विकास कामांच्या प्रलंबित देयकांमुळे कंत्राटदारांमध्ये असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत मोठी घोषणा केली आहे. "राज्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या कामांसाठी एकूण २०,५४६ कोटींची देयके प्रलंबित असून, त्यापैकी ५,७७२ कोटी रुपये तातडीने अदा करण्यात येत आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी विभागाच्या आर्थिक स्थितीचा आणि देयके याबाबत माहिती दिली.
कंत्राटदारांची देयके थकल्यामुळे अनेक ठिकाणी कामांची गती मंदावली होती, यासंदर्भात मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी विश्वास दिला की, निधीच्या कमतरतेमुळे कोणतीही महत्त्वाची पायाभूत सुविधा थांबणार नाही. ते म्हणाले, शिल्लक राहिलेली सुमारे १४,७७४ कोटींची देयके पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर प्राधान्याने देण्यात येतील.
जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांसाठी १०,५८६ कोटींचा निधी आधीच वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनांसाठी एकूण १७,३५७ कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातून प्रलंबित कामांना गती दिली जात आहे.
देयके रखडल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे संथ झाली होती. आता ५,७७२ कोटी रुपये तात्काळ मिळणार असल्यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि कंत्राटदारांना मजुरांचे पगार व साहित्याचे पैसे देणे सोपे होईल.
"पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रलंबित देयकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागाने ठोस नियोजन केले आहे. यामुळे कंत्राटदारांना दिलासा मिळेल आणि राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होईल."
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री