
पुणे (Pune) : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Purandar International Airport) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यादृष्टीने सोमवारी (ता. १७) पहिली बैठक झाली असून, त्यात भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, तसेच जागेची संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्यासह भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचे रेकॉर्ड अपडेट करणे, चार स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, जमिनींची संयुक्त मोजणी करणे आणि प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामास सुरुवात करणे या विषयांवर चर्चा झाली.
डुडी म्हणाले, ‘‘पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये विमानतळ होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना ‘एमआयडीसी’ने नुकतीच जारी केली आहे. त्यात कोणत्या गावातील, कोणत्या सर्व्हे नंबरमधील किती जमीन संपादित केली जाणार आहे, याची माहिती आहे.
तसेच, गावच्या हद्दीचा उल्लेख आहे. विमानतळासाठी सात गावांमधील दोन हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादन वेळेत होण्यासाठी चार ते पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती तत्काळ केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यानुसार केले जाणार आहे.’’