मुंबई (Mumbai) : हजारो कोटींचे उत्पन्न देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कुरणात कुणाचा कुणाला पायपोस नसल्यासारखी स्थिती आहे. शहरातील पे अँड पार्किंगचेच उदाहरण घेऊ. मुंबईतील विशेषतः शहर भागातील पे अँड पार्किंगची कंत्राटकामे अख्तर नावाच्या एकाच कंत्राटदाराकडे मोठ्या प्रमाणात असतात. संबंधित कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी संगनमताने थोडा थोडका नव्हे कोट्यवधी रुपयांवर राजरोसपणे डल्ला मारत आहेत. विशेष म्हणजे याची कुणाला खबरबात सुद्धा नाही.
मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राट कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा होत असून महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्याचा मोठा आरोप मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे महापालिकेच्या ऑनलाईन सभेत केला. मुंबईत अंदाजे २५० पे अँड पार्किंग सेंट्रल एजन्सीकडे आहेत. तर वार्डनिहाय ५०० पे अँड पार्किंग आहेत. या सर्व पे अँड पार्किंगच्या कंत्राटकामातून महापालिकेला दरवर्षी किमान १०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र त्यावर संबंधित कंत्राटदार व महापालिका अधिकारी हेच हात मारुन आपले खिसे भरत आहेत. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. या कंत्राटकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
मुंबईतील विशेषतः शहर भागातील पे अँड पार्किंगची कंत्राटकामे अख्तर नावाच्या एकाच कंत्राटदाराकडे मोठ्या प्रमाणात असतात. अनेक वर्षांपासून त्याची मक्तेदारी व मनमानी सुरु आहे. त्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठीच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीवरून महिला बचतगटांना काही ठिकाणी पे अँड पार्किंगची कामे देण्यात आली. (उदा. ‘ए’, ‘के/पश्चिम’, ‘पी/ उत्तर ‘, ‘पी/दक्षिण’ वार्डात) मात्र, अख्तरने तेथेही महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून तेथील कंत्राटकामे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. मात्र महापालिका प्रशासन त्याबाबत काहीच कारवाई करीत नाही.
वास्तविक, मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राट कामातून महिला बचतगटाला आर्थिक उत्पन्न मिळावे व त्यांनी स्वबळावर पुढील वाटचाल करावी या उदात्त हेतूने महापालिकेच्या काही पे अँड पार्किंग कंत्राटकामे काही महिला बचतगटांना देण्यात आली होती. मात्र अख्तरने या महिला बचतगटांकडील काही कंत्राटकामे सब कंत्राटदार बनून स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन तोच ही कंत्राटकामे गैरमार्गाने मिळवून कोट्यवधी रुपयांचा मलिदा खात आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला. तसेच, महापालिकेची काही पे अँड पार्किंगची ठिकाणे महापालिकेने कारवाई करुन काही कारणास्तव ताब्यात घेतली असून त्या ठिकाणी दुसरे कंत्राटदार नेमले जात नाहीत. परिणामी जुनाच कंत्राटदार महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून उत्पन्नावर हात मारत आहेत, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
तर, दुसरीकडे वर्षांनुवर्षे एकच कंत्राटदार महापालिकेच्या पे अँड पार्कवर कोट्यवधी रुपयांची लूट करीत आहे, असा आरोपही रवी राजा यांनी यावेळी केला. यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी, प्रशासनाने महापालिका पे अँड पार्किंग प्रकरणी माहिती घेऊन अहवाल सादर करावा, असे आदेश देत रवी राजा यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला. “आपल्याकडे पालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राटकामांबाबत काही तक्रारी आल्या आहेत. आपण स्वतः काही ठिकाणी अचानक धाड घालून पे अँड पार्किंग कामांची झाडाझडती घेणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.