.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर (Nagpur): महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब ‘डबल डेकर’ पुलाची निर्मिती केली असून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
रामगीरी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.
कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) हा जगातील डबल डेकर व्हायाडक्ट आहे. मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे नोंद घेतली आहे.
यापूर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. नागपूरला या निर्मितीमुळे संत्रा शहरासोबतच पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला आहे.
या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वे, महामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जगात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे. या पुलासाठी १ हजार ६५० टन स्टिलचा वापर करण्यात आला आहे.
जगातील पहिल्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट या पुलाचे सर्व देशांना आकर्षण आहे. प्रत्यक्ष निर्मितीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी व वास्तुकलेतील तज्ञ भेट देवून पाहणी करत आहे. अशा प्रकारच्या डबल डेकर पुलांची निर्मिती करणारे महामेट्रो व नागपूर हे पायोनिअर असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर महामेट्रोतर्फे बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट या पुलाच्या निर्मितीसंदर्भातील चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तंत्रज्ञानाचा अतुलनिय वापर करुन उड्डाणपुलावर गड्डीगोदाम, कडबीचौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटीव्ह चौक या पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहे.
हा उड्डाणपुल चार पदरी असून पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमीन स्तरावर आधीच असलेला महामार्ग आहे. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी छत्रपती चौकाचा समावेश असलेल्या उड्डाणपुलाचा देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यावेळी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यतिन राठोड, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एन व्ही पी विद्यासागर, प्रकल्प संचालक प्रकाश मुदलियार आदी अधिकारी तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.