Pune: दुय्यम निबंधक कार्यालयांनी घेतला मोठा निर्णय; दस्त नोंदणीचा वेळ वाचणार

Stamp
StampTendernama
Published on

पुणे (Pune): दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये गतिमानता आणण्यासाठी जिल्ह्यासह निबंधक कार्यालयाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दस्त नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘सेवा तत्पर गुणांकन पद्धत’ लागू केली आहे.

Stamp
Pune: बांधकामांमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचे मिळणार रिअल टाइम अपडेट

सोमवार (ता. १) पासून ही पद्धती लागू करण्यात आली आहे. अशी कृती करणारे राज्यातील हे पहिले कार्यालय आहे. विशेष म्हणजे शंभर गुणांच्या या पद्धतीमध्ये जे कर्मचारी पात्र ठरणार आहेत, त्यांना प्रमाणपत्रासह त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नागरिकांना दस्त नोंदणीसह विविध सेवा दिल्या जातात. या सेवा देण्याबाबत नागरिकांच्या सनदे‌द्वारे कालमर्यादा निश्‍चित केल्या जात आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी अभावानेच होते.

त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना तत्पर सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये कामावर हजर राहण्याच्या वेळेपासून ते दिलेले काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी गुणांकन पद्धत लागू करण्यात आली आहे.

Stamp
Pune: चर्चा झाली, टेंडरही निघाले; मग निर्णय बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ का आली?

नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नोंदणी झालेला दस्त विनाविलंब स्कॅन करून, संबंधित पक्षकारास परत देणे, ऑनलाइन पद्धतीने नोंदणीस दाखल होणाऱ्या भाडेकराराची नोंदणी त्वरित पूर्ण करणे, ऑनलाइन पद्धतीने फाइलिंगसाठी दाखल होणाऱ्या ‘नोटीस ऑफ इंटीमेशन’चे फाइलिंग त्वरित करणे, आदी कामांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे.

त्याचबरोबरच प्रायोगिक तत्त्वावर नोंदणी झालेल्या दस्तांच्या सेकंड पीडीएफवर ‘डिजिटल साइन’ करण्याचा ‘ई मोहोर’ हा प्रकल्प ३ कार्यालयात हाती घेण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे तोही प्रकल्प एक सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा उपनिबंधक (वर्ग १) संतोष हिंगाणे यांनी दिली.

दर महिन्यांच्या तीन तारखेला यांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २७ कार्यालयांतील दुय्यम निबंधकापासून ते शिपाई या सर्व पदांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Stamp
Pune: सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे रस्त्याच्या रुंदीचा वाद मिटणार?

अशी असेल गुणांकन पद्धत

- कार्यालयीन वेळेपूर्वी किमान पाच मिनिटे आधी लॉगीन (उपस्थित) ः ५ गुण

- कार्यालयीन वेळेनंतर ५ मिनिटांत लॉगीन करणे ः ५ गुण (वजा)

- कार्यालयीन वेळेनंतर ५ पेक्षा जास्त, पण १० पेक्षा जास्त नाही, लॉगीन करणे ः १० गुण (वजा)

- कार्यालयीन वेळेनंतर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळेनंतर लॉगीन करणे ः कार्यालयीन वेळेनंतरच्या उशिराच्या प्रत्येक मिनिटांसाठी ः २ गुण (वजा)

दस्त नोंदणी झाल्यावर स्कॅनिंग करणे

- नोंदणी झालेले सर्व दस्त त्याच दिवशी स्कॅनिंग पूर्ण करणे ः ३० गुण

- कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत स्कॅनिंगसाठी दस्त शिल्लक राहिल्यास ः प्रति दस्त १ गुण

- एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी स्कॅनिंगसाठी शिल्लक राहिलेले दस्त ः शिल्लक प्रति दस्त ३ गुण

- किमान २० दस्त नोंदणीच्याच दिवशी अनुक्रमांकानुसार स्कॅन केल्यास-+३० गुण (बोनस गुण)

ई-रजिस्ट्रेशन (लिव्ह अँड लायसेन्स)-

- पाचपेक्षा कमी प्रलंबित ः २० गुण

- ६ ते १५ प्रलंबितता ः १० गुण

- १६ ते ३० प्रलंबितता ः ० गुण

-३१ ते ५० प्रलंबितता ः १० गुण (वजा)

- ५१ ते १५० पर्यंत प्रलंबितता असेल, तर - १५ ते ४० गुण (वजा)

डिजिटल स्वाक्षरी

दस्त नोंदणी झाल्यानंतर त्याच दिवशी सर्व दस्तांवर डिजिटल स्वाक्षरी केल्यास ः ३० गुण

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com