
मुंबई (Mumbai Pune Missing Link Project): मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची निराशा करणारी बातमी आहे. बहुप्रतीक्षित लोणावळा-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची चौथी डेडलाईनही आता हुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर कमी होणार असून, त्यामुळे तब्बल अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची सर्व जण आतुरतेने वाट पाहात आहेत.
मुंबई-पुणे प्रवासाला नवी दिशा देणाऱ्या बहुप्रतीक्षित लोणावळा-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची (पर्यायी रस्ता) विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने नुकताच पाहणी दौरा केला. प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असला तरी डिसेंबरमध्ये लोकार्पणाची मुदत हुकणार अशी दाट शक्यता आहे. प्रकल्प ९६ टक्के पूर्ण झाला असला तरी सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, नियंत्रण सेंटर या बाबींना वेळ लागणार आहे.
यासदंर्भात माहिती देताना समिती सदस्य आमदार रईस शेख म्हणाले की, समितीने प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही सविस्तर चर्चा केली. २०१९ मध्ये कामास प्रारंभ झालेल्या ६,६९५कोटींच्या या प्रकल्पाच्या ४ डेडलाईन हुकल्या आहेत. प्रकल्प ९६ टक्के पूर्ण झाला असला तरी सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, नियंत्रण सेंटर या बाबींना वेळ लागणार आहे.
या प्रकल्पात खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने ४ मार्गिकांसाठीचे दोन बोगदे आहेत. पहिला बोगदा ९ किमी, तर दुसरा बोगदा २ किमीचा आहे. या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा ‘केबल-स्टेड पूल’ जमिनीपासून सुमारे १३२ फूट उंचीवर आहे. ‘डिसेंबरच्या डेडलाईन पाळण्यासाठी घाई करू नका, प्रकल्प सुरक्षित होण्याकडे लक्ष द्या, अशी सल्लागार कंपनीला समिती सदस्यांनी सूचना केली’, अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली.
मिसिंग लिंक’ १३.३ किमी लांब, आठ पदरी नियंत्रित प्रवेश मार्ग आहे. हा मार्ग २० किमी लांब धोकादायक आणि वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या लोणावळा-खंडाळा घाट विभागाची जागा घेईल. यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरचे अंतर ६ किमी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे -मुंबई प्रवासाला व नागरी आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा दावा आमदार शेख यांनी केला.
सार्वजनिक उपक्रम समितीच्या दोन दिवशीय पाहणी दौऱ्यामध्ये समितीचे अध्यक्ष राहुल कुल, आमदार सुभाष देशमुख, निलेश राणे, वरुण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, संजय पोतनीस, शिवाजी कर्डीले, अशोक पाटील, मोहन मते, हेमंत ओगले आदी आमदार सहभागी झाले होते.