
मुंबई (Mumbai): जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या एलिफंटा बेटाचा विकास करण्यासाठी सिडकोने टेंडर (CIDCO Tender) प्रसिद्ध केले आहे. मास्टर प्लॅनिंग, आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
एलिफंटा बेटाला जागतिक वारसा लाभलेला आहे. अशा या वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असलेल्या एलिफंटा बेटाचा आणि पर्यटकांच्या विकासासाठी पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आयटीडीसी, बंदर विभाग, एनजीओ, स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात एलिफंटा बेटाचा विकास आणि पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, गैरसोयी दूर करण्यात यश आले आहे.
एलिफंटा बेट सुमारे पाच चौरस किलोमीटर क्षेत्रात विसावले आहे. यात सर्वाधिक जमिनीचे क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. तर पुरातत्व, नौदल, बंदर विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्याही काही जमिनीचे क्षेत्र आहे.
आता जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाचा विकास करण्यासाठी सिडकोने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. एलिफंटा व न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग आणि आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्त करण्यासाठी सिडकोने टेंडर काढले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सल्लागार सेवा देणाऱ्या अनुभवी कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात आली आहेत. त्यानंतर पर्यटन, पर्यटकांसाठी विकास मॉडेल व आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागार एजन्सीच्या सल्ल्यानुसारच एलिफंटा व न्हावा बेटावर विकास कामांची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती सिडकोचे प्लॅनिंग विभागाचे अधिकारी प्रियदर्शन वाघमारे यांनी दिली.
वुई मेक सिटीजचा दावा करणाऱ्या सिडकोने याआधीच नवी मुंबई परिसरात दुसऱ्या मुंबईची निर्मिती केली आहे. मात्र सिडकोकडून होत असलेल्या या हस्तक्षेपावर एलिफंटा आणि न्हावा बेटावरील स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन नवी मुंबईतील भूमिपुत्रांसाखे आमचेही हाल करणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.