

मुंबई (Mumbai): राज्यातील एसटी महामंडळात सर्व २०३५ बसेस इलेक्ट्रिक बसेस असतील. एकही डिझेल बस शिल्लक राहणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत नियम २९३ अंतर्गत प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या ८,३०० बसेस या एसटी महामंडळातील शेवटच्या डिझेल बसेस असतील. त्यानंतर दरवर्षी किमान २,००० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करून संपूर्ण ताफा टप्प्याटप्प्याने ईव्हीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. तसेच विद्यमान डिझेल बसेसचेही कालांतराने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर केले जाईल.
राज्यात नुकत्याच तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण झाले. पुढील ४ ते ५ महिन्यांत आणखी पाच हजार बसेस ताफ्यात दाखल होणार असून, या सर्व बसेस राज्यात टप्प्याटप्प्याने वितरित केल्या जाणार आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी (लहान) बसेस घेण्यात आल्या आहेत. मोठ्या बसेस पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम भागांमध्ये या बसेसद्वारे सेवा दिली जाणार असून, नफा-तोट्याचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ २०० व्होल्वो बसेस घेणार असून, त्यामध्ये १७० सिटिंग आणि ३० स्लीपर कोचचा समावेश असेल. प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा देण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग स्टेशनची उभारणीही मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे.
एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाखालील जागांवर एसटी महामंडळामार्फत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही माफक दरात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करून ईव्ही चार्जिंगसाठी आवश्यक ऊर्जा उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासोबतच एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक प्रवास सुविधा देण्यासाठी परिवहन विभाग कटिबद्ध असून, सदस्यांच्या मागण्यांनुसार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.