
पारनेर (Parner) : अहिल्यानगर (Ahilyanagar) लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जल जीवन योजनांमध्ये (Jal Jeevan Mission) मोठा गैरव्यवहार (Scam) झाला आहे. मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ८३० पाणी योजना मंजूर आहेत. या पाणी योजनांच्या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंगळवारी (ता. ११) लोकसभेत केली.
लंके म्हणाले, की पाणी निसर्गाचे वरदान आहे, ते जपून वापरण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला. केंद्र सरकारने 'हर घर नल, हर घर जल' अशी घोषणा करत जलजीवन मिशन ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. माझ्या मतदारसंघात ८३० योजना मंजूर आहेत. त्यासाठी एक हजार ३३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
योजनांच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखरेख केली जाते. जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर तीन हजार २०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या योजनांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाच्या झाली आहेत. या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करावी.