
लोणंद (Lonand) : शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा असा एकूण सुमारे ७२ किलोमीटर चौपदरी रस्त्याचे पेव्हड शोल्डर (पक्का खांदा) पद्धतीच्या दोन भागांमध्ये होणाऱ्या कामांसाठी सुमारे ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या कामाचा प्रारंभ होणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या या रस्त्यामुळे जलद, सुरक्षित, दर्जेदार वाहतूक सुविधा शिरवळ, लोणंद, वाठार परिसरासाठी उपलब्ध होणार आहे. गतिमान विकास साधण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन भर पडली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गाला जिल्ह्यातील बहुतांशी भाग जोडला गेला आहे. पुणे- बंगळूर या महामार्गावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या रस्त्यावरून टोल वाचवण्यासाठी वाहनांची वर्दळ खूपच वाढली आहे. या रस्त्यावरून केलेल्या निरीक्षणात दररोज शिरवळ- लोणंद मार्गावर ९५४३ वाहने, तर लोणंद- सातारा मार्गावर ११ हजार १७५ वाहनांची वाहतूक होते, तसेच या पट्ट्यात पावसाळ्यात बऱ्यापैकी पर्जन्यमान असल्यामुळे शिरवळ-लोणंद आणि लोणंद सातारा या दोन्ही मार्गांची दर्जोन्नती करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. सततचा पाठपुरावा व वस्तुस्थिती याचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ४३७ कोटी रुपयांच्या पेव्हड शोल्डर म्हणजेच फरसबंद खांदा पद्धतीच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. लोणंद-शिरवळ परिसरात वाढलेले नागरीकरण, स्थिरावलेले औद्योगीकरण याचा विचार करून हा महामार्ग आणि साताऱ्याला जोडणारा हा रस्ता दर्जेदार व्हावा, या दूरदृष्टिकोनामधून या रस्त्याबाबत मांडणी केली होती. त्यासाठी पाठपुराव्यासह केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या आमच्या प्रयत्नांना नितीन गडकरी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज या रस्त्याचे ४३७ कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण विकासकाम मार्गी लागले आहे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.
लोणंद-शिरवळ परिसरातील वाढलेले नागरीकरण, स्थिरावलेले औद्योगीकरण याचा विचार करून हा महामार्ग आणि साताऱ्याला जोडणारा हा रस्ता दर्जेदार व्हावा, या दूरदृष्टिकोनामधून आम्ही मांडणी केली होती. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून आज या रस्त्यासाठी ४३७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
-उदयनराजे भोसले, खासदार
दृष्टिक्षेपात....
-शिरवळ ते लोणंद या रस्त्यावर १३ आणि लोणंद- सातारादरम्यान १९ अशा ३२ पुलांची
पुनर्बांधणी होणार
- सात जंक्शन्स (रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण) नव्याने तयार केले जाणार
-लोणंद- सातारा या मार्गावर तीन नवे पूल उभारण्यात येणार
- शिरवळ ते सातारा व्हाया लोणंद या मार्गावर एकूण १३१ कल्व्हर्टस् बांधण्यात येणार (रेल्वे किंवा रस्ता यांच्या खालून पाण्याचा पाट किंवा नळ, भूमिगत नाले आदी व्यवस्था करणे याला कल्व्हर्टस् असे संबोधण्यात येते.)