
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी केले. (Metro Projects In Maharashtra News)
सह्याद्री अतिथिगृह येथे केंद्रीय नगरविकास मंत्री खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील नागरी क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खट्टर यांनी महाराष्ट्रातील मेट्रो नेटवर्कचा सविस्तर आढावा घेऊन मुंबईसारख्या शहरांमध्ये मेट्रोसारखे प्रकल्प निश्चितच गरजेचे आणि उपयुक्त आहेत असे अधोरेखीत केले.
महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पात पन्नास टक्के केंद्र सरकार आणि पन्नास टक्के राज्य सरकार या पद्धतीने भागीदारी करण्याच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवली. तसेच राज्याच्या पुढील मेट्रो प्रकल्प तसेच नगरविकास विभाग अंतर्गत करावयाच्या विविध प्रकल्पातील अनुंषगिक बाबींमध्ये आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्याबाबतचे प्रस्ताव विभागांनी केंद्राकडे सादर करावेत असे त्यांनी सूचीत केले.
महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नगरविकास आणि इतर संबंधित विभागांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम सुरू असून विविध प्रकल्पांच्या व्यापक आणि अधिक प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे खट्टर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, मुंबई मेट्रोसह महाराष्ट्रात दळणवळण सुविधांची व्यापक उपलब्धता करण्यात येत असून, मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. रेल्वे, बस व मेट्रो यासारख्या वाहतुकीच्या विविध माध्यमांतून प्रवाशांना एकात्मिक तिकीट प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पुण्यातील नवीन दोन मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत केंद्रीय विभागाकडून मंजुरी मिळावी.
मेट्रो प्रकल्प राज्याने आपल्या निधीतून उभारले असून त्यात केंद्राकडून पन्नास पन्नास टक्के भागीदारी केल्यास राज्याला वाढीव निधी प्राप्त होईल, ज्यातून अधिक विस्तृत प्रमाणात मेट्रोचे काम पुढे नेता येईल.
त्याचप्रमाणे मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थी निकषांत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. केंद्राने अमृत योजनेतंर्गत राज्याला जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याचा योग्य विनियोग करण्यास राज्याचे प्राधान्य आहे.
स्वच्छ भारत अभियानात राज्यात प्रभावी काम सुरू असून २०२३ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक प्राप्त करत उत्तम कामगिरी बजावलेली आहे. अशाच पद्धतीने प्रभावीरित्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य आणि निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत मुंबई मेट्रो लाईन तीन, महामेट्रो अंतर्गत नागपूर, पुणे व इतर मेट्रो प्रकल्पांच्या कामांचा तसेच गृहनिर्माण, अमृत योजना, म्हाडा, यासह अन्य नगरविकासच्या विविध योजनांच्या कामांसंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.