
मुंबई (Mumbai) : राज्य सरकारची लोकप्रिय 'आनंदाचा शिधा' योजना बंद करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात 'आनंदाचा शिधा' योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच काय, तर योजनेबाबतचा कोणताही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. या योजनेवर एकावेळी साधारण सुमारे ५५० कोटी रुपये इतका खर्च केला जात होता. गेल्या अडीच वर्षात या योजनेवर सुमारे ३ हजार कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.
गेल्या अडीच वर्षात महायुतीकडून अनेक लोकप्रिय योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मात्र यापैकी काही योजनांना निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामध्ये आनंदाचा शिधा योजनेचाही समावेश आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज आणि तिजोरीतील खडखडाट यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग शोधतानाच जुन्या योजनांना कात्री लावण्याशिवाय महायुती सरकारपुढे पर्याय उरलेला नसल्याचे दिसून येते. आर्थिक चणचण असली तरी कोणत्याही योजनेवर त्याचा परिणाम होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले असले तरी शिंदे सरकारच्या काळातील लोकप्रिय योजना मात्र एकामागोमाग एक बंद केल्या जात आहेत. दरम्यान, आता योजनांचे महत्व संपले आणि एकनाथ शिंदे यांचे देखील महत्व संपले आहे. लाडका बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची योजना होती. त्यांना वाटले होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर ही योजना चांगल्या पद्धतीने चालवता येईल. पण आता ते मुख्यमंत्री नाहीत आणि ज्या योजना त्यांनी सुरू केल्या त्या बंद पाडल्या जातायत. आनंदाचा शिधा तुम्ही चालू केला होता, तो शिधा कुठे आहे?, गोरगरिबांच्या योजना हे सरकार बंद करत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
आनंदाचा शिधाचा निवडणूक काळात उपयोग केला आता हा आनंदाचा शिधा दु:खाचा झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला. 'आनंदाचा शिधा' योजनेच्या माध्यमातून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 'आनंदाचा शिधा' प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच याप्रमाणे १०० रुपयांत वितरित करण्यात येत होता. राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देण्यात येत होता.