अदानी इफेक्ट : अबब! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खर्चात तब्बल 25 हजार कोटींचे उड्डाण
मुंबई (Mumbai) : सिडको निर्मित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे आल्यानंतर प्रकल्प खर्च तब्बल 24 हजार 600 कोटींनी वाढला आहे. जीव्हीके कंपनी हे विमानतळ 16 हजार 700 कोटी रुपयांमध्ये उभारणार होती. आता अदानी समूहाने हा खर्च 41 हजार 302 कोटींवर नेऊन ठेवला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती सार्वजनिक-खासगी भागीदारी या तत्त्वावर केली जात आहे. 24 ऑक्टोबर 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाचे काम जीव्हीके कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण विमानतळ उभारणीचा खर्च 16 हजार 700 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. जागेच्या सपाटीकरणाची आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सिडकोवर टाकण्यात आली होती. विमानतळाच्या क्षेत्रातील टेकड्या हटवणे, नदीचा प्रवाह वळवणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या कामासाठी सिडकोने एक हजार 800 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते.
18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर दोन वर्षांत आश्चर्यकारकरीत्या जीव्हीके कंपनीने आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे जाहीर केले. त्यानंतर या कंपनीने विमानतळ उभारणीचे अधिकार अदानी समूहाकडे हस्तांतरीत केले. या विमानतळाचे एकूण पाच टप्पे असून डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरच 19 हजार 646 कोटी खर्च होणार आहेत. तसा अहवालच अदानी समूहाच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीने पर्यावरण मंत्रालयाला पाठवला आहे. पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची क्षमता प्रत्येक वर्षाला सुमारे नऊ कोटी प्रवाशी हाताळण्याची होणार आहे. नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने 2035 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने आता डिसेंबर 2024 ही डेडलाईन दिली आहे. मात्र आतापर्यंत विमानतळाचे काम अवघे 57 टक्के इतकेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे अदानी डिसेंबर 2024ची डेडलाईन पाळणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.