EXCLUSIVE:नगरविकासच्या तब्बल अडीच हजार फाईल्स ३ महिने होत्या कुठे?

विभागाकडे हस्तांतरितच झाल्या नसल्याचे गंभीर प्रकरण
Mantralay
MantralayTendernama

मुंबई (Mumbai) : ठाकरे सरकार गेल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगरविकास खात्याच्या 'निर्णय न झालेल्या' तब्बल अडीच हजार फाईल्स (धारिका किंवा संचिका) जवळपास ३ महिने मूळ नगरविकास विभागाकडे हस्तांतरितच झालेल्या नसल्याचे गंभीर प्रकरण पुढे आले आहे. शेवटी ३ महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये तत्कालीन मंत्री आस्थापनेवरील विशेष कार्य अधिकाऱ्याने नगरविकास विभागाच्या (१) अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून यासंदर्भात आठवण करुन दिली आहे. अडीच हजार फाईल्स म्हणजे जवळपास एक मोठी खोली भरतील इतक्या होतात.

उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १० जून २०२२ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे सर्व मंंत्र्यांकडील मंत्रालयीन आस्थापनांना त्यांच्याकडील कागदपत्रे, नोंदवह्या, फाईल्स इत्यादी सर्व मूळ विभागांकडे परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि तत्कालिन मंत्री मंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच नूतन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्याने व नूतन मुख्यमंत्री यांच्याकडेच नगर विकास विभागाचा कार्यभार राहणार असल्यामुळे मंत्री आस्थापनाने 'निर्णय न झालेल्या' या सर्व धारिका स्वतःकडे राखून ठेवाव्यात मूळ विभागाकडे म्हणजे नगर विकास विभागाकडे परत न करण्याचा धोरणात्मक पण तोंडी निर्णय घेतला होता. याबाबत नगरविकास विभागाचे (१) अपर मुख्य सचिव यांचे खाजगी सचिव व इतर संबंधित यांना ही माहिती देण्यात आली होती, असे पत्रात नमूद केले आहे.

त्यानुसार तत्कालिन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे तत्कालिन विशेष कार्य अधिकारी तथा उपसंचालक, नगर रचना प्र ल गोहिल यांच्याकडे या फाईल्स होत्या. नूतन मुख्यमंत्री कार्यालयात जुन्या अधिकारी व कर्मचारी यांच्याही सेवा कायम राहणार आहेत असे सांगण्यात आल्यामुळे त्यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी आजही मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहेत. तथापि, अद्यापही गोहिल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती प्रशासकीय आदेशाच्या प्रतीक्षाधिन आहे. अशा परिस्थितीत गोहिल हे त्यांच्या मूळ नियुक्तीच्या कार्यालयात रुजू व्हावे किंवा कसे या द्विधा मनस्थितीत आहेत. सबब, प्रशासकीय कामकाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्याकडील या प्रलंबित फाईल्स सध्यस्थितीत कोणाकडे हस्तांतरीत कराव्यात याबाबत आदेश द्यावेत अशी विनंती गोहिल यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तब्बल ३ महिन्याहून अधिक काळ सुमारे अडीच हजार फाईल्स मूळ विभागांकडे परत न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही महत्त्वाच्या 'अर्थपूर्ण' फाईल्स एका मोठ्या खासगी व्यक्तीकडे होत्या अशी चर्चा रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com