आतातरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ लेनचा करा ; अजित पवारांची मागणी
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात सर्वात जास्त ट्रॅफीक मुंबई-पुणे हायवेवर आहे. सध्या हा ६ लेनचा रोड आहे. पण अपघात टाळण्यासाठी आता हा रोड मोठा करण्याची गरज आहे. जायला ४ लेन आणि यायला ४, असा ८ लेनचा हा मार्ग केला पाहिजे. यासाठी यापूर्वीच भूसंपादन झालेले आहे. त्यावर राज्य सरकारने तात्काळ काम सुरु करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (सोमवार) विधानसभेत केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कामकाजाचा आज तिसरा दिवस आहे. विधानसभेत अधिवेशनाच्या सुरुवातीला शिव संग्रामचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटेंच्या अपघातानंतर वर्षा गायकवाड यांनी महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करत लक्षवेधी मांडली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंच्या अपघातासंदर्भातील निवेदन सादर केले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील अपघातांवर लक्ष वेधले आहे. अजित पवार यांनी मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील अपघात टाळण्यासाठी हा महामार्ग आठ लेनचा करावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त ट्रॅफीक मुंबई-पुणे हायवेवर आहे. हा ६ लेनचा रोड आहे. पण आता हा रोड मोठा करण्याची गरज आहे. जायला ४ लेन आणि यायला ४, असा ८ लेनचा हा मार्ग केला पाहिजे. यासाठी जागा पहिलेच अधिग्रहीत केलेली आहे. त्यावर सरकारने तात्काळ काम सुरू करावे. या रस्त्यावर कंटेनर कुणाला घाबरत नाही. छोट्या गाड्यांना जुमानत नाही. वाहतूक शिस्त पाळत नाहीत, एका लेनमध्ये जात नाही. त्यामुळे चार लेन केल्यास दोन लेन कंटेनरकरिता आणि दोन लेन कार आणि इतर वाहनांकरिता उपलब्ध राहतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. हायवे असो की इतर मार्ग आमदारांच्या गाड्या अति वेगाने धावत असतात. अगदी लाख लाख रुपये दंड एकेकाला आलेला आहे. या मार्गावर कॅमेरे लागलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यांचे लोकेशन बदलत असते. ओव्हस्पिडींगमध्ये गाडी मालकाच्या फोनवर मेमो जातो. आता यावरही सरकारने उत्तर शोधले पाहिजे. वेगमर्यादा निश्चित केलेली आहे. पण त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, यासाठी जनजागृती करण्याची गरज अजित पवारांनी व्यक्त केली.
एखादा अपघात झाला की, दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित होतो. यामध्ये लोकांची फरफट होते. विनायक मेंटेंच्या अपघातातही रायगडची हद्द आहे की मुंबईची हद्द आहे, असा प्रश्न पुढे आला होता. असे होऊ नये, ज्या पोलिस स्टेशनला आधी कळविले जाते, त्यांनी आधी तेथे जावे. जाताना संबंधित पोलिस स्टेशनला कळवावे. हद्द निश्चित करण्याच्या भानगडीत बराच वेळ निघून जातो आणि जखमींपर्यंत वेळेत मदत पोहोचू शकत नाही. यासाठी सरकारने पोलिसांना तात्काळ सूचना द्यावा, असेही पवार म्हणाले.

