
पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) होणाऱ्या G-20च्या बैठकीची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून, येणाऱ्या पाहुण्यांचे पुणेकरांना उत्साहाने स्वागत करावे. पण या काळात वाहतूक कोंडीमुळे आपली थोडीशी गैरसोय होईल, पण तो स्वागताचाच एक भाग मानावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) केले. तसेच विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या दरम्यानचे मेट्रोची कामे ११ जानेवारीपासून बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यात १६ आणि १७ जानेवारी रोजी ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने बैठका होणार आहेत. यासाठी २० सदस्य देशांसह निमंत्रीत देशातून सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या मार्गाची पाहणी केली. रस्त्यात काही ठिकाणी थांबून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच काही सूचनाही दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जी २०च्या पुण्यात तीन वेळा बैठका होणार आहेत. शहरीकरण वाढत असल्याने पायाभूत सुविधा मजबूत करणे, वेगात काम कसे करावे यावर या बैठकीत चर्चा होणार आहेत. त्यांचे कार्यक्रम महापालिका ठरवणार नाही, पण त्यांचे स्वागत करण्यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. यासाठी विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यापर्यंत पाहणी केली. सुशोभीकरण, स्वागत आणि सुरक्षा या तीन मुद्द्यांवर ही पाहणी केली. सुशोभीकरणाची कामे पुढील दोन तीन दिवसांत पूर्ण होतील. विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेट्रोचे काम ११ जानेवारीपासून बंद केले जाईल.
पाहुण्यांसाठी विशेष ट्रॅक
वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ते बंद नसतील, पण जे पाहुणे वेगवेगळ्या विमानाने पुण्यात येणार आहेत, त्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना जाण्यासाठी विशेष एक ट्रॅक खुला असेल त्यामुळे त्यांना वेगाने जाता जाईल व इतर वाहतूकही सुरू असेल, असे पाटील यांनी सांगितले.
‘जी २०’ च्या निमित्ताने गुंजन टॉकीज ते बंडगार्डन पूल आणि शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ या दरम्यानचे मेट्रोचे काम ११ जानेवारी ते १७ जानेवारी या दिवसांमध्ये बंद असणार आहे. याकाळात मेट्रोसाठी केलेली बॅरिकेटींग कमी करून जास्त रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असेल यासाठी प्रयत्न केला जाईल. तर इतर मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू राहील.
‘जी २०’ परिषदेमुळे आपल्या देशाची प्रतिमा जगभरात जाणार आहे, त्यामुळे एरवीची टीका, राजकीय आक्षेप आता सहकार्यामध्ये बदलली पाहिजे. सुशोभीकरणासाठी पडदे लावले, इतर कामे केली तर त्यात गैर नाही.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री