
पुणे (Pune) : इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन आणि प्रदूषण कमी होण्यासाठी महापालिकेने २५० ठिकाणी स्टेशन उभारून ई-बाईक भाड्याने दिल्या जाणार आहेत. हा प्रकल्प सहा महिन्यांच्या आत सुरू करावा, असे आदेश दिले होते. पण आत्तापर्यंत जवळपास चार महिने होत आले तरी एकाही ठिकाणी स्टेशन उभारणे, ई-बाईक भाड्याने देण्यास सुरवात झालेली नाही. अधिकाऱ्यांनी वारंवार आढावा घेतला असला तरी अजूनही या कामात प्रगती झाली नसल्याने हा प्रकल्प बारगळल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरातील वाहनांच्या संख्येत दरवर्षी किमान एक लाख ७० हजार वाहनांची भर पडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वापरातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पीएमपीने ताफ्यातून डिझेल बस हद्दपार केल्या. त्याऐवजी सीएनजी व ई- बसची संख्या वाढवली जात आहे. शहरात दुचाकींची संख्या जास्त आहे. कोणत्याही भागात जाण्यासाठी सोईचे आणि वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी दुचाकींचा वापर जास्त होतो. त्यामुळे प्रशासनाने ई-बाईक भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव मागविले होते.
पुणे शहरात यापूर्वी सायकल भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. महत्त्वाच्या ठिकाणी सायकल भाड्याने मिळत होत्या. काही काळ त्यांचा योग्य पद्धतीने वापर झाला. मात्र, त्यानंतर सायकलींचा वापर कमी झाला, तसेच त्यांची मोडतोडही सुरू झाली. काही सायकली या गटारातही आढळल्या. त्यामुळे सायकलींचा प्रयोग फसल्याने कंपन्यांनी पुण्यातून गाशा गुंडाळला आहे.
वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यासाठी ई- बाईक भाड्याने देण्याचा प्रकल्प केला जाणार आहे. या कंपनीला दिलेली सहा महिन्यांची मुदत अजून संपलेली नाही. पण, जानेवारीपर्यंत त्यांनी किमान २०-२५ ठिकाणी गाड्या भाड्याने द्याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू होता. ही सेवा लवकर सुरू व्हावी, यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा केली जाईल.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका