
पुणे (Pune) : वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड रस्त्याला जोडण्यासाठी नव्याने केलेला रस्ता अखेर संमिश्र पद्धतीने करण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. १.८ किलोमीटरचा हा रस्ता जमिनीवरून तसेच उन्नत (इलिव्हेटेड) केला जाणार आहे. यामध्ये पौड रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी सबवे प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पासाठीच्या २५० कोटीच्या खर्चास आज अंदाज समितीच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.
सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यात वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा रस्ता असा मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे विधी महाविद्यालय रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. पण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली वेताळ टेकडी जशी आहे तशीच राहावी, उलट तिचे संवर्धन व्हावे अशी भूमिका पर्यावरण प्रेमी नागरिकांची आहे. या प्रकल्पाविरोधात टेकडीवर आंदोलनेही झालेली आहेत. पर्यावरण तज्ज्ञ, नागरिकांची भूमिका लक्षात घेत महापालिकेने सुमारे १.८ किलोमीटर लांबीचा रस्ता करताना त्यातील १.४ किलोमीटरचा रस्ता हा जमिनीवरून असणार आहे. ज्या ठिकाणी टेकडी आहे व पर्यावरणास हानी पोहचू शकते अशा ४०० मीटर अंतरावर ८ फूट उंचीवरून उन्नत रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे, पाण्याचा प्रवाह, प्राणी, नागरिक यांचा कोणताही अडथळा होणार नाही. अशा पद्धतीने हा रस्ता केला जाईल, असे कुमार यांनी सांगितले.
पौड फाट्याकडून बालभारतीकडे जाताना प्रस्तावित रस्त्यावर झोपडपट्टी आहे. सुमारे सव्वा तीन एकर जागेत या झोपड्या आहेत. एसआरएकडून याचे सर्वेक्षण करून घेतले होते, पण आता पुन्हा नव्याने घरे झाल्याने तेथे पुन्हा आठ दिवसांत सर्वेक्षण करून घेतले जाईल, असे कुमार यांनी सांगितले.
असा असणार सबवे
पौड रस्त्याकडून बालभारतीकडे जाण्यासाठी एक रस्ता असणार आहे. तसेच शिवाजीनगरकडे जाण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या पाठीमागून एनसीसी कार्यालयाच्या चौकापर्यंत सबवे असेल. त्यामुळे डेक्कन, शिवाजीनगर भागात जाणाऱ्या वाहनांना पत्रकार नगर येथील चौकात यू टर्न घेऊन येण्याची गरज नाही. तसेच या चौकातील कोंडीही कमी होणार आहे.