
पुणे (Pune) : सेवेत सुधारणा होत असल्याचा कितीही गवगवा करण्यात येत असला तरी हा दावा फूसका असल्याचा प्रत्यय पुणे स्थानकावरून (Pune Railway Station) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येतो आहे. देशातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये समावेश असलेल्या पुण्यातील रेल्वे स्थानकावरील फलाटांची लांबी वाढविण्यात (Yard Remolding) आलेली नसल्याने त्याचा फटका हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज सहन करावा लागतो आहे. फलाटांची लांबी वाढण्यासाठी निधी उपलब्ध असतानाही हे काम का करण्यात आलेले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डींगचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिला जातोय. २०१६-१७ मध्ये याला मंजुरी मिळाली. यासाठी ५२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात याला ३१ कोटींचा निधी मंजूर झाला, तो पुणे विभागाला मिळाला देखील आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाची प्रबळ इच्छाशक्ती नसल्याने अद्याप या कामास सुरुवातच झाली नाही. परिणामी, दररोज सुमारे १८ हजार १८४ प्रवाशांना ‘वेटिंग’वर राहावे लागत आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांची लांबी (यार्ड रिमोल्डींग) न वाढल्याने दररोज पुण्याहून सुटणाऱ्या सुमारे ४२ रेल्वेला अतिरिक्त डबे जोडले जात नाहीत. प्रवाशांची संख्या अधिक अन् डबे कमी, अशी परिस्थिती दररोज निर्माण होते. याचा थेट फटका पुण्याहून प्रवास करणाऱ्या १८ हजार प्रवाशांना बसतो. केवळ कमी लांबीचे फलाट असल्याने पुण्याहून सुटणाऱ्या ४२ रेल्वेचे १८ वरून २४ डबे करता येत नाहीत. परिणामी, प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागते. विशेष म्हणजे या कामासाठी निधीची उपलब्धता आहे, तरीदेखील अद्याप या कामाची सुरवात झालेली नाही.
२४ डब्यांसाठी हवे ६१० मीटरचे फलाट
पुणे रेल्वे स्थानकांवर सहा फलाट आहेत. पैकी केवळ फलाट क्रमांक १ हाच ६१० मीटर लांबीचा आहे. २४ डब्यांसाठी ६१० मीटर लांबीचा फलाट पुरेसा ठरतो. अन्य फलाटांची लांबी मात्र तुलनेने कमी आहे. फलाट २ : ४७० मीटर, फलाट ३ : ५५५ मिटर, फलाट ४ : ४३१ मीटर, फलाट ५ : ४३१ मीटर व फलाट ६ : ५१० मीटर.
पुणे स्थानकातील स्थिती
दररोज पुण्याहून प्रवास सुरू होणाऱ्या रेल्वे : ७२
१८ डबे असलेले रेल्वे : ४२
पुणे रेल्वे स्थानकावरून धावणारे : २५०
दररोजची प्रवासी संख्या : १ लाख ५० हजार
लोकलच्या फेऱ्या : ४१
फलाट व डब्याची क्षमता :
फलाट १ : २६ डबे
फलाट २ : २२ डबे
फलाट ३ : २५ डबे
फलाट ४ : १८ डबे
फलाट ५ : १७ डबे
फलाट ६ : २२ डबे
पुणे स्थानकाचे यार्ड रिमोल्डींगचे काम खूप किचकट आहे. पहिल्या टप्प्यात फलाट दोन व सहाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाईल. सर्व तांत्रिक कामांची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात कामास सुरवात होईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
रेल्वे प्रशासनाने तत्काळ यार्ड रिमोल्डींग केले पाहिजे. फलाटांची लांबी वाढल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा