PMC: पुणेकरांच्या तक्रारींना कोण दाखवतेय कचऱ्याची टोपली?

Complaints
ComplaintsTendernama
Published on

पुणे (Pune) : पुण्यातील नागरिक महापालिकेकडे (Pune Municipal Corporation) वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी करतात. आपल्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर पालिकेकडून कृती केली जाईल, अशी सामान्य पुणेकरांची अपेक्षा असते. मात्र, पुणेकरांच्या या तक्रारींची दखल घेण्याऐवजी त्यांना अनेकदा कचऱ्याची टोपली दाखविली जाते, हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. रस्त्याला पडलेले खड्डे, कचरा, अपुरा पाणी पुरवठा, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी चुकीची कामे यासह अनेक तक्रारी महापालिकेच्या वॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकवर येतात. त्याची दखल घेऊन ही तक्रार संबंधित विभागाला पाठवून त्याचे निरसन करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी तक्रारीचे निवारण न करताच परस्पर ती तक्रार सोडविल्याचे सांगून बंद करून टाकत असल्याचे दिसते आहे.

Complaints
किमती वाढल्याने पुण्यात घर खरेदीला ब्रेक; लोकांना हवीत 'अशी' घरे..

पुणे महापालिकेत दाखल झालेली समाविष्ट गावे, वाढणारी लोकसंख्या, बांधकामे यामुळे प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील समस्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांना निदर्शनास आल्या नाहीत म्हणून त्या तशाच राहू नये. नागरिकांच्या समस्या निदर्शनास आल्यास त्यांनी त्याबाबत महापालिकेकडे तक्रार करावी व महापालिकेकडून त्या दूर करण्यासाठी लगेच कार्यवाही होईल यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी महापालिकेने सोशल मीडियाचा वापर सुरू केला. पुणे महापालिकेने फेसबुक, ट्विटर, वॉट्सॲपवरून नागरिकांच्या तक्रारी घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये ट्विटर, फेसबुकला नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपल्या भागातील छोट्यामोठ्या समस्यांचे फोटो व ठिकाणासह तक्रारी केल्या जात आहेत.

Complaints
लालपरीचे पंख आणखी विस्तारणार; एसटीच्या ताफ्यात २ हजार साध्या बस...

महापालिकेच्या हँडलला फोटो फेसबुकवर किंवा ट्विट केल्यानंतर त्यावर तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या तक्रारीचा हा टोकण क्रमांक असून, तक्रार निवारणासाठी ती संबंधित विभागाकडे पाठवून देण्यात आली आहे. टोकन क्रमांकावरून ती ट्रॅक करता येईल असे उत्तर नागरिकांना दिले जाते. तक्रारीची लगेच दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते. पण पुढे काही दिवस झाले तरी समस्या जशी आहे तशीच राहते. कचरा उचलला जात नाही, खड्डे बुजविले जात नाही, रस्‍त्यावरील अतिक्रमण, अपुरा पाणी पुरवठा, पादचारी मार्गाची झालेली तोडफोड, अवैध बांधकाम यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण नागरिकांना तुमच्या तक्रारीचे निवारण झाले आहे असे उत्तर पाठवून तक्रार बंद केली जाते. अनेकदा तर तक्रारदाराला कोणतीही माहिती न देताच तक्रार बंद झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

Complaints
'लम्पी'साठी सरकार सरसावले; 873 पशुधन पर्यवेक्षक भरतीसाठी टेंडर

ट्विटर, फेसबुक, वॉट्सॲपवरील तक्रारी आल्यानंतर त्याची कारवाई केली की नाही हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. नागरिकांनी वैतागून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार पाठविल्यानंतर मग अधिकारी, कर्मचारी कामाला लागतात. पण इतर वेळी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कोणताही धाक नसल्याने त्यांच्याकडून बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून पुन्हा सोशल मीडियावर महापालिकेच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली जात आहे.

Complaints
नागपुरातील अनधिकृत ट्रान्सपोर्ट प्लाझाला संरक्षण कुणाचे?

बिबवेवाडी येथील साईशिल्प कुकडे सोसायटी परिसरात भर रस्त्यात फक्त झाडाचे खोड राहिले आहे. ते वाहतुकीसाठी चालणाऱ्यांसाठी धोकादायक असल्याने त्याची तक्रार करून उरलेले खोड काढून घ्यावे अशी तक्रार केली होती. पण अनेक आठवडे उलटून गेले तरीही ते खोड काढले नाही आणि आम्ही केलेली तक्रार बंद करून टाकण्यात आलेली आहे. महापालिकेकडून वारंवार हा अनुभव येत आहे. महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून तक्रारींचा आढावा घेणे आवश्‍यक आहे.
- संजय शितोळे, तक्रारदार

Complaints
नाशिक मनपाने का लावली हजार कोटींच्या कामांना कात्री?

पीएमसी केअर या महापालिकेच्या सेवेच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रारी सोडविल्या जात आहेत. पण तक्रारी परस्पर बंद करण्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास अधिकारी १५ दिवसांपूर्वी नियुक्त केला आहे. या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या यंत्रणेवर लक्ष राहील. चुकीच्या पद्धतीने तक्रारी बंद केल्या जाणार नाहीत. तसेच नागरिकांचा प्रतिसादही घेतला जाणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com