
पुणे (Pune) : नागरिकांची कामे अडवायची, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवायचे, त्यांचा छळ करून पैसे घेतल्याशिवाय कामे मार्गी लावायची नाहीत, असे प्रकार महापालिकेत वाढले आहेत. नागरिकही या लाचखोरीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करीत नाही. त्यामुळे कामे अडवून लाच घेण्याचे प्रकार घडत आहेत.
पारदर्शक, गतिमान कारभारासाठी पुणे महापालिकेकडून ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी अडवणूक सुरूच आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतरही हा प्रकार सुरू आहे. अतिक्रमण कारवाईत पकडलेला माल सोडविणे, आकाशचिन्ह परवान्यासाठी अडवणूक, मिळकतीला नाव लावून घेणे, नोंदणी करणे, पाणीपुरवठ्याचे नवे कनेक्शन, कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराची अडवणूक करणे, महापालिका कर्मचाऱ्याची इच्छित ठिकाणी बदली यासाठी लाच घेण्याचे प्रकार घडत आहेत. बांधकाम विभागातही सर्व कागदपत्रे, नकाशे व्यवस्थित देऊन फाइल सबमिट केली, तरी नव्या त्रुटी काढून अडवणूक केली जात आहे. काही नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यामुळे ते कर्मचारी जाळ्यात अडकले. एका उपायुक्तावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रणच नाही
महापालिकेच्या मुख्य खात्यांवर प्रशासनाचे काही प्रमाणात नियंत्रण आहे, पण नागरिकांची अडवणूक करून पैसे घेण्याचे प्रकार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू आहेत. कामे न करता बोगस बिल काढण्यात क्षेत्रीय कार्यालये सराईत झाले आहेत. मात्र, नागरिकांची छोटी कामे करतानाही ‘लक्ष्मी’ दर्शन केल्याशिवाय अर्जाकडे लक्षच दिले जात नाही. यामध्ये शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांच्या तालावर कामे सुरू आहेत. याकडे क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्तांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.
पाणीपुरवठा विभाग अग्रेसर...
- सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील यास अटक (ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजारांची मागणी)
- उपअभियंता मधुकर थोरात व कनिष्ठ अभियंता अजय मोरे यास अटक (दिवसभरात पाचपेक्षा जास्त टँकर भरण्यासाठी टँकरचालकाकडे महिन्याला २० हजारांची मागणी)
- चतुःश्रृंगी विभागाच्या उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याच्या नावाने लाच मागणाऱ्या महेश शिंदे याला अटक (व्यावसायिक नळजोड कनेक्शन घेण्यासाठी १७ हजारांची मागणी)
- स्वारगेट विभागाचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील याला लाच घेताना रंगेहात पकडले (धायरी भागात पाणीपुरवठ्याच्या केलेल्या कामाबद्दल ३० हजारांची मागणी)
- मिळकतकर विभागाचे विभागीय निरीक्षक संजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल. (मिळकत नावावर करून घेण्यासाठी २० हजारांची मागणी)
‘‘माझ्या तक्रारीवरून खासगी व्यक्तीला १७ हजारांची लाच घेताना पकडले होते. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही कामासाठी अडवणूक केली गेली. सध्या महापालिकेत झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया या हिमनगाचे टोक आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे, याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भान नाही. तक्रारी केल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.’’
- सुभाष जाधव, नागरिक
‘‘लोकसेवकास नेमून दिलेले काम त्याने वेळेत व सचोटीने केले पाहिजे. विभागप्रमुखांनी कामाचा नियमीत आढावा घ्यावा व कोणतीही फाइल प्रलंबित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. बिले वेळेत
निकाली काढले पाहिजे, त्यावर योग्य मुदतीत योग्य तो निर्णय झाला पाहिजे अन्यथा कारवाई केली जाईल. याबाबत आयुक्तांच्या मान्यतेने परिपत्रक काढले जाणार आहे.’’
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका