
सातारा (Satara) : येथील पालिकेच्या आरोग्य विभागातून नव्याने प्रशासकीय कार्यवाही सुरू असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठीच्या ठेक्याची फाइल गहाळ झाल्याची पालिकेत कुजबूज सुरू आहे. शोधूनही फाइल सापडत नसल्याने ठेका प्रक्रियेसाठीच्या कागदपत्रांची संबंधित विभागातील काही जणांनी युद्धपातळीवर पुन्हा जुळवाजुळव केल्याची माहिती समोर येत आहे.
पालिकेचा आरोग्य विभाग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहिला आहे. कचरा संकलनाची मुदत संपल्यानंतर पालिका प्रशासनाने हा ठेका पुणे येथील एका ठेकेदारास दिला. त्या ठेकेदाराने कचरा संकलन आणि घंटागाड्यांचे संचलन, नियंत्रण स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू केले. याच काळात रस्ता सफाई व इतर कामांसाठी जास्तीचे मनुष्यबळ असल्याचा मुद्दा चर्चेत आला. यानंतर त्याकामासाठी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आलेल्या १२० जणांना कोणतीही मुदत न देता घरचा रस्ता दाखवला. त्याविषयी ओरड झाल्यानंतर पालिकेत कार्यरत असणाऱ्या लाल बावट्यासह इतर कर्मचारी संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढल्याबाबत पालिका प्रशासनाकडे हरकत नोंदवली. हरकत नोंदवल्यानंतरच्या काळात कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांनी आंदोलने करत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत मार्ग काढण्याची विनंती केली. यानुसार त्यांनी पालिका प्रशासनास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. पालिका प्रशासनाने यानंतर कामावरून केलेल्या कंत्राटी कामगारांपैकी ३० जणांना कंत्राटी तत्त्वावर पूर्ववत कामावर घेतले. त्यानंतर उर्वरित ९० जणांना पुन्हा सामावून घेण्यासाठी नव्याने ठेका काढण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. यासाठीची प्रशासकीय कार्यवाही करत तयार केलेल्या कागदपत्रांची फाइल आरोग्य विभागातून गहाळ झाल्याचे समोर आले.
गहाळ झाली की लांबवली..?
ठेका जाहीर करण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही केलेल्या कागदपत्रांची फाइल सापडत नसल्याने ती शोधण्याचे काम गतिमान करण्यात आले. शोधूनही फाइल सापडत नसल्याने त्या ठेक्यासाठीच्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. फाइल गहाळ झाली की कोणी लांबवली? याविषयीही काही जण शंकाही व्यक्त करत आहेत.