'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25000 उद्योजक घडविणार'

Uday Samant
Uday SamantTendernama

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आगामी वर्षामध्ये ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे तसेच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी २०२२ ते २०२३ वर्षामध्ये ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वी अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग आदींचा समावेश होता. आता इतर मागास वर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आदी घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचाही या योजनेत समावेश करण्यात येईल.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय बँकांद्वारे कर्ज वितरित करण्यात येत होते. आता यापुढे जिल्हा बँकाद्वारे तरुणांना कर्ज मिळणार आहे. याबाबतचे शासनादेश पारित करण्यात येतील, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात २२८० कोटींचे अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प खासगी जागांवर होणार असून त्यासाठी शासन नियमांप्रमाणे प्रोत्साहने देणार आहे. याद्वारे २५ हजार रोजगार निर्माण होतील, असे सामंत म्हणाले. १६ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत असून याची उद्योग विभागाने जोरदार तयारी चालविली आहे. याद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली जाईल. विशेषतः वीजेवर चालणारी वाहने, अन्न प्रक्रिया, सौर ऊर्जा आदी क्षेत्रात यावेळी गुंतवणूक करार करण्यात येतील, अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकार लवकरच हायड्रोजन पॉलिसी लागू करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com