ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा चौक होणार कोंडीमुक्त; दोन पुलांसाठी...

Thane
ThaneTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीन हात नाका चौकातील मुख्य उड्डाण पुलाच्या पायथ्याजवळ दोन्ही बाजूस यू आकाराचे २ उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २८९ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. नाशिक दिशेकडील उड्डाणपुलाची एकूण लांबी ७०० मी. तर मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाची लांबी ९१९ मी. असेल. दोन्ही उड्डाणपूल प्रत्येकी ३ मार्गिकांकरीता प्रस्तावित करण्यात आले आहेत. एमएमआरडीए लवकरच यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया सुरु करणार आहे. या पुलांच्या उभारणीमुळे तीन हात नाका चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे.

Thane
'बीएमसी'ला आवडे सौंदर्यीकरण; आकस्मिक निधीतून ९०० कोटींची उधळण

ठाणे शहरातून पूर्व द्रुतगती महामार्ग जातो. या मार्गावरील तीन हात नाका चौक हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी याठिकाणी यापूर्वीच उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई आणि नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने या पुलावरून वाहतूक करतात. तर, या पुलाखालील चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणेद्वारे नियंत्रित केली जाते. परंतु या चौकात शहरातील तीन मुख्य अंतर्गत रस्ते आणि चार सेवा रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहनचालकांना चौकात तीन मिनिटे थांबून रहावे लागते. यामुळे सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होते. तसेच या परिसरात वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो मार्गाचे स्थानक उभारण्यात येणार असून यामुळे या ठिकाणी वाहने तसेच पादचारी वर्दळ यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी मे. आकार अभिनव कन्सल्टंट प्रा.लि. या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने परिसरातील वाहनांची संख्या, परिसरातील सेवा वाहिन्या, मेट्रो व अन्य प्रस्तावित प्रकल्प, वृक्ष, असे सर्वांचे सविस्तर सर्वेक्षण करुन प्रकल्पाकरीता विविध पर्याय सूचविले होते.

Thane
प्रतिक्षा संपली; उद्या निघणार अधिवेशनाचे ९५ कोटींचे टेंडर

यामध्ये अस्तित्वातील उड्डाणपुलावरुन लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर नवीन उड्डाणपुल बांधणे, लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर वाहनांकरीता भुयारी मार्ग बांधणे आणि महामार्गावर अस्तित्वातील उड्डाणपुलांच्या पायथ्याजवळील परिसरात दोन्ही दिशेला यू आकाराचे दोन स्वतंत्र उड्डाणपूल बांधणे या पर्यायांचा समावेश होता. परंतु महामार्गाखालून जात असलेल्या मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्या, प्रस्तावित मेट्रो मार्गिका व स्थानक तसेच अंतर्गत रस्त्यांची अपुरी रुंदी यामुळे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची उभारणी करणे शक्य नसल्याची बाब समोर आली होती. तर, महामार्गावर अस्तित्वातील उड्डाणपूलांच्या पायथ्याजवळील परिसरात दोन्ही दिशेला यू आकाराचे दोन स्वतंत्र उड्डाणपुल बांधण्याच्या पर्यायात कोणतीही अडचण येत नसून या पर्यायामुळे सर्व दिशेकडील वाहतूक विना अडथळा होणार असल्याचे समोर आले होते. त्यास आता एमएमआरडीएने मंजुरी दिल्याने महामार्गावर दोन यू आकाराचे उड्डाण पूल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Thane
मुंबई : महत्त्वाच्या 'या' ब्रीजचे काम बीएमसी २ वर्षात करणार पूर्ण

नाशिक दिशेकडील उड्डाणपूल पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका चौकापासून काही अंतरावर सुरुवात होऊन महामार्गास समांतर दिशेने पुढे जाऊन अस्तित्वातील उड्डाणपुलाच्या समाप्तीनंतर वळण घेऊन पलीकडच्या बाजूने पुन्हा महामार्गास समांतर जाऊन मुंबई दिशेकडे चौकाच्या अलीकडे काही अंतरावर उतरेल. अशाच प्रकारे मुंबई दिशेकडील उड्डाणपूल तीन हात नाका चौकापासून काही अंतरावर सुरुवात होऊन महामार्गास समांतर दिशेने पुढे जाऊन अस्तित्वातील उड्डाणपुलाच्या समाप्ती नंतर वळण घेऊन पलीकडच्या बाजूने पुन्हा महामार्गास समांतर जाऊन नाशिक दिशेकडे चौकाच्या अलीकडे काही अंतरावर उतरेल. नाशिक दिशेकडील उड्डाणपुलाची एकूण लांबी ७०० मी. तर मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाची लांबी ९१९ मी. असेल. दोन्ही उड्डाणपूल प्रत्येकी ३ मार्गिकांकरीता प्रस्तावित करण्यात आले आहेत. तीन हात नाका उड्डाणपुलांच्या काही भागामुळे सध्या त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या महामार्ग व सेवा रस्ते यामधील उद्यानांचा काही भाग बाधित होणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाधित उद्यानांच्या भागांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर ठाणे व मुलूंड स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. ठाणे शहरातून येणाऱ्या व प्रस्तावित रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांकरीता तीन हात नाका प्रकल्पाच्या मुंबई दिशेकडील उड्डाणपुलावरुन परस्पर उन्नत मार्गिका जोडण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. प्रस्तावित स्थानकाचे बांधकाम अद्याप सुरु झालेले नसल्याने सध्या या उन्नत जोडमार्गाचे सविस्तर डिझाईन विविध पर्यायांची पडताळणी करून ठरविण्यात येईल व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com