
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (BMC) ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्याबाबतच्या ९० कोटींच्या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. टेंडरच्या अटी-शर्ती या सिनेहोम ब्रॉडकास्ट कंपनीला हे टेंडर मिळावे अशारीतीने फ्रेम करण्यात आल्या आहेत. संबंधित कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावाही शेलार यांनी केला आहे.
आमदार आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. सिनेहोम ब्रॉडकास्ट कंपनीला या कामाचे टेंडर मिळाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आणि तांत्रिक सल्लागाराच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.
टेंडरच्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला हे टेंडर मिळावे म्हणून घालण्यात आल्या आहेत. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. त्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी न करताच संबंधित कंपनीला काम प्रस्तावित केल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.
शैक्षणिक बाब असल्याने त्या विषयातील तज्ज्ञ व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते. परंतु त्या कंपनीकडे या कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकूणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो. या टेंडरबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यात वारवांर संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत, त्याबाबतच्या तक्रारी आपल्याला तसेच लाचलुचपत विभागाकडेही करण्यात आल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.
तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, आयटी विभागातील अधिकारी आणि संबंधित कंपनी यांच्यामध्ये संगनमत झाले असेही दिसते आहे. त्यामुळे तातडीने ही टेंडर प्रक्रिया रद्द करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच फेर टेंडर काढण्यात यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.
सिनेहोम ब्रॉडकास्ट कंपनीला या कामासाठीचे कंत्राट मिळाले होते. व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा देण्यासाठी ९० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. महापालिकेच्या ४५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा देण्यासाठीचे हे कंत्राट आहे.