सीएसएमटीच्या पुर्नविकासाला मान्यता; लवकरच 'इतक्या' कोटींचे टेंडर

CSMT

CSMT

Tendernama

मुंबई (Mumbai) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) (CSMT) पुनर्विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सीएसएमटी इमारत व परिसराचा पुनर्विकास खासगी विकासकांमार्फत करण्यात येणार आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकासाचा प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या पुरातन वारसा वास्तू समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी सुमारे १,३५० कोटींचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले जाणार आहे.

ऐतिहासिक दर्जा असलेल्या सीएसएमटी स्थानकात उपनगरीय रेल्वेसाठी सात फलाट आहेत. येथून सीएसएमटी ते कसारा, खोपोली मुख्य मार्गाबरोबरच हार्बर पनवेल लोकलही सुटतात. याशिवाय मेल, एक्स्प्रेससाठीही फलाट आहेत. या स्थानकात मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. शिवाय या रेल्वे स्थानकाला परदेशी पर्यटकही भेट देतात. अशा स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वारसा जपण्यात येणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर सीएसएमटी परिसरात 'रेल मॉल'ही उभारण्याचा विचार आहे.

सीएसएमटीचा पुनर्विकास सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर करण्यात येणार होता. यासाठी एकाच कंपनीची निवड केली जाणार होती, परंतु हा निर्णय रद्द करून हायब्रीड बील्ड ऑपरेट पद्धत अवलंबली जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि खासगी ६० टक्के गुंतवणूक असेल. यामुळे प्रकल्प खर्चही १,६०० कोटी रुपयांवरून १,३५० कोटींवर आला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पुरातन वारसा वास्तू समितीची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. अलीकडेच मागवलेल्या रुची प्रस्तावात पूर्वी निवड केलेल्या कंपन्यांनाच पुनर्विकास व गुंतवणुकीसाठी संधी दिली जाणार आहे. अदानी, गोदरेज आणि ओबेरॉय यांसह ९ कंपन्यांनी इच्छा दर्शविली असल्याचे रेल्वेतील उच्च पदस्थांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com