
औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील खड्ड्यांचा प्रश्न औरंगाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असताना मनपा प्रशासनाने जुन्या शहरातील जिल्हा सत्र न्यायालयामागील प्लाॅट क्रमांक-१ महेश घाडगे यांचे घर-केसरसिंगपुरा-समाधान काॅलनी-कोकणवाडीकडे जाणारा रस्ता गेल्या काही वर्षापूर्वी टेंडर काढले, कंत्रादटाराने रस्ता खोदून ठेवला. पण त्यावर डांबरीकरण केलेच नाही. केवळ खोदकाम करून कंत्राटदाराने लाखो रूपयाचे बिल उचलले की काय, अशी शंका नागरिकांना येत आहे. खोदकामामुळे या मार्गावरून जालनारोडला येणारे वाहनधारक प्रचंड त्रस्त आहेत. खडी आणि खड्ड्यामुळे अंगठेफोड सोसावी लागत आहे.
कोकणवाडीकडून समाधान काॅलनी मार्गे येताना मनपाचे तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार डी. पी. कुलकर्णी यांचे घर ते केसरसिंगपुरा येथील प्लाॅट क्रमांक-१ येथे राहणारे ॲड. महेश घाडगे यांचे निवासस्थान हा जिल्हा सत्र न्यायालयाचे पाठीमागचा परिसर आहे. येथील रस्त्याची सध्या अत्यंत विदारक अवस्था झाली आहे. मनपाने (Aurangabad Municipal Corporation) २०१५-१६ मध्ये या रस्त्यावर तब्बल १० लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते. यासाठी प्रभाग क्रमांक-९ अंतर्गत टेंडर देखील काढण्यात आल्या होत्या.
मात्र, सहा वर्षांपासून कंत्राटदाराने केवळ रस्ता खोदून ठेवला. त्यामुळे अर्धवट काम करून निधी उचलल्याची शंका येथील सुजान रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या खराब रस्त्यावर डांबरीकरण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती; मात्र मागील सहा वर्षांपासून रस्ता तसाच आहे. याउलट आधीचा रस्ता बरा होता, कामासाठी म्हणून रस्त्याचा पृष्ठभाग जेसीबीने ओरबडून काढल्याने रस्ता खराब झाला. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागतोय.