
औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील झोन क्रमांक-९ अंतर्गत ज्योतीनगर, जयनगर, दशमेशनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात असून, याकडे मनपा प्रशासन लक्ष देणार का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शहराच्या दक्षिण भागातील हायप्रोफाईल नागरिकांची तसेच सरकार दरबारी बडे अधिकारी, उद्योजकांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतीनगर, जयनगर, एचबीएच काॅलनी आणि दशमेशनगर भागातील काॅलनी अंतर्गत रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम (road works) रखडले आहे. नेहमीच येणार्या आणि अवकाळी पावसाने या रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्याने संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतानाही दुरुस्तीकडे डोळेझाकपणा करत आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात अश्वासने देतात, त्यानंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय आहे. या रस्त्यांवर खड्ड्याचे (potholes) मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. सदर रस्ते हे चाळीस वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. मनपाच्या संबंधीत बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या दूरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. काॅलनी अंतर्गत दिव्यांची देखील दुर्दशा झाल्याने काळोखातून खड्ड्यातून वाट काढताना चंद्रसफरीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जेष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग क्रमण करावे लागत आहे.तसेच या भागातील खुल्या जागांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे. काही जागांवर लोकसहभागातून वृक्षारोपन केले आहे. मात्र तेथील रानटी झाडाझुडपांनी येथील चांगल्या झाडांची वाढ खुंटलेली आहे. शिवाय मनपाने काही जागांवर बांधलेल्या सामाजिक सभागृहांची देखील दुर्दशा झालेली आहे. याच भागातील मराठवाड्यातील पहिला प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेल्या कवितेची बाग अखेरच्या घटका मोजत आहे. येथील नामांकीत कवितांवर लावलेल्या दिव्यांची तोडफोड झालेली आहे. जाॅगिंग ट्रॅकही उखडल्याने नागरिकांना शतपावली करताना अंगठे फोड सोसावी लागत आहे. उद्यानाकडे जाणारे रस्तेही धड नाहीत. उद्यानात ग्रीनवेस्टचे ढिग देखील वर्षानुवर्ष सडत पडलेले आहेत. संंबंधित विभागांनी याकडे लक्ष देवून रस्ते, उद्याने, पथदिवे आणि सामाजिक सभागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आज या भागातील टेंडरनामा प्रतिनिधीने पहाटे सहा ते साडेनऊ पर्यंत येथील नागरिकांसोबत रस्त्यांच्या परिस्थितीचा अनुभव पाहता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादूरुस्त होत असून वाहून चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्यांवर चाळीस वर्षांपासून खड्ड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघताच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी मनपा प्रशासनातील प्रभाग अभियंत्यांनी या भागातील रस्त्यांची त्वरित दखल घेवून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असा तगादा नागरिकांकडून लावला जात आहे. दरम्यान प्रतिनिधी जयनगरात शिरताच येथील नागरिकांनी आम्ही स्मार्ट सिटीत नावालाच राहत असल्याचा टोला मारत आमच्या वसाहतीला लागून नाल्याची भिंत प्राण्यांच्या भितीने आम्हालाच बांधावी लागते, खुल्या जागेची स्वच्छता लोकसहभागातून करावी लागते , प्रत्येक वेळी मनपाकडे तक्रारी करूनही निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आता आम्हीही वैतागलो असे म्हणत नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.