अधिकाऱ्यांची मिलिभगत: 27 कोटींच्या रस्ता दुरूस्तीवर कोणाचा डोळा?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : एकीकडे एनएच-५२ धुळे-सोलापूर आणि दुसरीकडे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या गंगापूर तालुक्यातील शरणापूर-साजापूर या वाळूज-पंढरपूर उद्योगनगरीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून, या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Aurangabad
कंत्राटफेम आमदाराचे 'लाड' पुरवतेय कोण?750कोटीच्या टेंडरचा 'प्रसाद'

सार्वजनिक बांधकाम विभागाने सात वर्षांपूर्वी या शरणापूर-साजापूर रस्त्याच्या दूरूस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ७ लाख २४ हजार ८१३ रूपये मंजूर करण्यात आले होते. यानंतर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गंगापूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत बी-१ टेंडर काढले होते. त्यात २२.९१ कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या औरंगाबादच्या धनंजय कन्स्ट्रक्शन कंपनीला १७ जानेवारी २०१५ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. टेंडरमधील अटीशर्तीनुसार १२ महिन्यात रस्त्याचे बांधकाम करून पुढील ३६ महिने संबंधित ठेकेदाराकडे देखभाल दूरूस्तीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे सहा कोटींचा केलेला खर्च काही वर्षातच खड्ड्यात गेला.

काम अर्धवट सोडून ठेकेदार पळाला

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्याच्या दूरूस्तीसाठी ५३ कोटी रूपये निधी कागदावर मंजूर झाल्याची जाहिरात करत तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात २५ डिसेंबर २०२१ रोजी भूमिपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता दूरूस्तीसाठी केवळ १५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले. सदर कामाच्या भूमिपूजनपूर्वीच अर्थात नोव्हेंबर २०२१ मध्ये टेंडर काढण्यात आल्या होत्या. या रस्त्या दुरूस्तीचे काम लातूरच्या के.एच.कन्सट्रक्शन कंपनोचे खंडू पाटील या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याने मार्गावर चार आरसीसी पूल बांधले. बदल्यात त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने ९३ लाख रूपये दिले. मात्र बांधकामात अडथळा निर्माण करणारे इलेक्ट्रीक पोल आणि काही कच्ची पक्की अतिक्रमणे हटवण्याबाबत संबंधित कंपनीचे ठेकेदार खंडू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सातत्याने पत्र व्यवहार केला. मात्र विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर मुदतीत रस्त्याचे काम केले नसल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून काम अर्धवट स्थितीत असताना काढून घेतले आणि रस्ता दुरूस्तीला ग्रहण लावले.

Aurangabad
'कॅग'ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची नोटीस; कोविड काळातील खर्च...

२७ कोटींचे नव्याने टेंडर

यानंतर वर्षभरातच १५ कोटीचा हा खर्च २७ कोटींवर गेला. डिसेंबर २०२२ मध्ये रस्ता दूरूस्तीसाठी नव्याने २६ कोटी ९२ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानूसार नव्याने निविदा काढण्यात आल्या. यात ८ डिसेंबर २०२२ रोजी ड्रीम कन्सट्रक्शन दिल्ली, गंगामाई इंडस्ट्रीज ॲन्ड कंन्सट्रक्शन प्रा. लि. औरंगाबाद, जीएनआय इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. औरंगाबाद,  आणि मुंबईच्या जे.पी.कंन्सट्रक्शन कंपनीने ८ डिसेंबर रोजी टेंडर भरले. मात्र दोन आठवड्याचा कालावधी उलटून देखील अद्याप टेंडर ओपन केले जात नसल्याने इतर टेंडरधारकांच्या मनात  सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

टेंडर विभागाचे एकमेकाकडे बोट

यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर लिपिक सदावर्ते यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी टेक्निकल बीड खुल्या करण्यासाठी ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी मुख्य लेखाधिकारी प्रमोद शर्मा यांच्याकडे सुरू असल्याचे म्हणत, हे काम मंत्रालयास्तरावरचे आहे, प्रक्रियेला दोन महिने लागतील, इकडून प्रशासकीय कामकाज झाल्यानंतर प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पून्हा मंत्रालयात जाईल, असे म्हणत मुख्यालेखाधिकारींकडे बोट दाखवले. त्यावर प्रतिनिधीने शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, आधीच ५८ टेंडरची तपासणी सुरू आहे, अशी कारणे पुढे करत तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

Aurangabad
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 'MMRDA'ची 2700 कोटींची टेंडर

आणि सुरू झाल्या हालचाली

यावर प्रतिनिधीने मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता विवेक बडे यांना थेट सवाल करताच २२ डिसेंबर रोजी तांत्रिक शाखेने टेक्निकल बीड ओपन केले. यानंतर येत्या दोन दिवसात फायनान्सियल बीड ओपन करून पुढील कार्यवाहींच्या हालचाली वेगात सुरू केल्या आहेत. आता पुढील कारभाऱ्यांनी तातडीने प्रशासकीय कामकाजात कागदी घोडे न नाचवता  ठेकेदाराची तातडीने निवड करून रस्त्याची दुरुस्ती केल्यास वाहनधारकांना खऱ्या अर्थाने राहत मिळणार आहे.

टक्केवारीत काम रखडले का?

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाला जोडणारा प्रमुख राज्य मार्ग क्रमांक-२१७  शरणापूर - साजापूर या मुख्य रस्त्याची पार चाळणी झाल्याच्या शेकडो तक्रारी ग्रामस्थ, उद्योजक आणि कामगारांकडून टेंडरनाम्याकडे प्राप्त झाल्या. शहरापासून ३० ते ३५ किलोमीटर दूर असलेल्या या संपूर्ण ५ किमी. रस्त्याची प्रतिनिधीने स्वतः दूचाकीवर जाऊन  पाहणी केली. यात साजापूर-करोडी नाक्याकडून शरणापूर रेल्वे फाटकापर्यंत रस्त्यावर जुन्या ठेकेदाराने खड्ड्यात खडी पसरवून ठेवल्याने साधी बैलगाडी देखील चालू शकत नाही, अशी रस्त्याची अवस्था आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष झाल्याचे साफ दिसून आले.

मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठीच...?

टेंडरनामा प्रतिनिधीने याभागात फेरफटका मारला असता सहभागी झालेल्या चार कंपन्यांपैकी औरंगाबादेतील एका ठेकेदाराला एका राजकीय लोकप्रतिनिधीचा आशिर्वाद व अधिकाऱ्यांशी असलेले साटेलोटे यामुळे मर्जीतल्या याच ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी काही महिने कागदी घोडे नाचवले जात असल्याची शंका या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र याच ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाचे पुरावे आम्ही न्यायालयात सादर करून त्याचा ठेका रद्द करू असा पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतल्याचा कानोसा मिळाला आहे. 

अशी आहे रस्त्याची सद्यस्थिती

● वाळुज-पंढरपूर उद्योगनगरीला जोडणाऱ्या या मार्गावरील अनेच  गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबादेत  यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. शरणापूर ते साजापूर  या ५ किमी अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

● रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी कुंपण अपघातास आमंत्रण देत आहे. रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात. नेहमीच हजारो वाहने या रस्तावरून जात येत असल्याने खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्डय़ामुळे व्यवस्थीत पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्डात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक, वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी टक्केवारीत रस्ता न अडवता तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे.

● सतत वर्दळ असलेल्या मार्गावर अडचणी या मार्गावर अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची २४ तास  मोठी वर्दळ असते. या पाच किलोमीटर अंतरावर जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिक व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून अनेक गावातील नागरिकांसाठी हा मार्ग शहरात येण्यासाठी सोयीचा ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com