Aurangabad
AurangabadTendernama

स्पॉट पंचनामा : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय की मृत्यूचा महामार्ग?

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रवाशांकडून तक्रारींचा पाऊस सुरू आहे. दरम्यान या रस्त्याची टेंडरनामा प्रतिनिधीने रविवार ते सोमवार सलग दोन दिवस पहिल्या टप्प्यात हर्सुल टी पाॅईंट ते फुलंब्री व दुसऱ्या टप्प्यात फुलंब्री ते सिल्लोडपर्यंत दुचाकीवर दोन्ही बाजूने १२० किमीची पाहणी केली. त्यात नव्या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी मायनर आणि मेजर क्रॅक (लहान मोठ्या भेगा) पडल्याचे दिसले. काँक्रिट रस्त्याच्या कडेला भूंगा (हनीकाॅब) लागल्याचे दिसले. त्यामुळे ठेकेदाराच्या कामावर राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांपुढे प्रतिनिधीने प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र, जिथे कुठे कामाचा दर्जा खराब असेल तिथे सुधारणा करणार असल्याचे म्हणत हा विभाग वेळ मारून नेत आहे. तर या रस्त्याची जबाबदारी असलेले उपअभियंता अभिजित घोडेकर यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने रस्ताबांधणीसंदर्भात अधिक संशय बळावत आहे.

Aurangabad
BMCची कोरोना काळातील टेंडर प्रक्रिया 'कॅग'च्या रडारवर

जागोजागी दुभाजक पंक्चर 

इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांना बगल देत पाच ते दहाफुटावर जागोजागी दुभाजक पंक्चर केल्याने ठेकेदाराचा बांधकामाचा खर्च वाचला. मात्र, यामुळे अपघाताचे सावट या महामार्गावर कायम आहे. दुभाजकासाठी वापरलेल्या कठड्यांना देखील भेगा पडल्या आहेत. नव्याकोऱ्या दुभाजकाच्या पायथ्याशी उगवलेले गवत निकृष्ट काम असल्याचे ओरडून सांगत आहे. दुभाजकाचे काम देखील अर्धवट असल्याचे दिसत आहे. 

गावकरी म्हणाले, आगीतून फोफाट्यात पडलो

दरम्यान प्रतिनिधीने हर्सुल ते सिल्लोड दरम्यान सावंगी, चौका, बिल्डा, फुलंब्री, बनकिन्होळा, फरशी फाटा, वडोद, आळंद , लिहाखेडी, बाभुळगाव, डोंगरगाव, मंगरूळ, पालोद, पालेगाव , पाथ्री, गोळेगाव, सराडी, बोदड, बाळापूर, केर्हळाफाटा, निल्लोड, खेडीभायगाव येथील गावकऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग विभागात दाखल केल्याचे समजले. रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात शेतात पाणी येऊन पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय दुकानात पाणी शिरत असल्याचे व्यावसायिक म्हणाले.पण संबंधित ठेकेदारांचा अधिकारी आणि राजकारण्यांना  अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याने रस्तेकामात मनमानी सुरू असल्याचा कानोसा मिळाला. 

राष्ट्रीय महामार्ग की मृत्युचा महामार्ग 

पाच वर्षांपूर्वी हा राज्य महामार्ग क्रमांक ८ सार्वजिक बांधकाम विभागाकडून केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे कामही चालू झाले; परंतु पुढे रस्त्याचे काम चालु मागे भेगा पडायला सुरूवात झाली. कामात वाळु, खडी, सिमेंट आणि पाण्याचे अयोग्य प्रमाण तसेच पुरेपूर पाण्याचा मारा होत नसल्याने या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा (चिरा) गेल्या असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हा तकलादू रस्ता पाहून राष्ट्रीय महामार्ग की राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Aurangabad
औरंगाबाद-जळगाव रस्ता दुरुस्तीत ठेकेदारांची दिरंगाई;प्रवाशांत संताप

हा घ्या निकृष्ट कामाचा पुरावा

चौका ते बिल्डा दरम्यान प्रतिनिधी रस्त्याची पाहणी करत असताना वळणमार्गावरील कामाला भेट दिली. कंपनीच्या स्वरूपराॅय नामक क्षेत्रीय व्यवस्थापकाला खडी, मुरूमाचे टेस्ट रिपोर्ट मागितले असता त्याने उत्तर देण्यास नकार दिला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कुठे आहेत असे विचारल्यावर इथे कोणी अधिकारी येत नसल्याचे तो म्हणाला. प्रतिनिधी चौकशी करत असताना थेट रस्त्याचा खालचा थर (बेड) मातीने भरला जात असल्याचे दिसले. हे चित्र कॅमेऱ्यात कैद करताच स्वरूपराॅय याची बोबडी वळाली. ठेकेदाराचे पितळ उघडे पडले पडताच त्याने रस्त्याच्या कडेला माती टाकत असल्याचे म्हणत सावरासावर केली. 

दीड हजार कोटीचा रस्ता, जागोजागी खस्ता

औरंगाबाद-जळगाव राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. १४८ किमी लांबीत २४ मीटर रूंद सिमेंट रस्त्यासाठी दीड हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात दीड मीटर रुंदीचे दुभाजक, दोन्ही बाजुने दोन मीटरचा रस्त्यालगतचा डांबरी शोल्डर पट्टे, २०.६ मीटर रूंद रस्ता वाहतूकीसाठी खुला असे रस्त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला. २९ जुलै २०१७ मध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावेळी गडकरींच्या सूचनेनुसार रस्त्याचे चौपदरीकरण जागेच्या उपलब्धतेनुसार सुरू करण्यात आले.

प्रवाशांच्या आशेवर पाणी

यामुळे नवीन सुधारीत महामार्ग बनणार; तसेच दळणवळणाची सुविधा तत्पर होणार या आशेने औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील ये-जा करणारे वाहनधारक; तसेच या मार्गावर असलेले शेतकरी समधान व्यक्त करीत होते.

यंत्रणा सोडून ठेकेदार पसार

सुरूवातीला रस्त्याचे काम आंध्रप्रदेशातील लॅन्सको अँड ऋत्विक कंपनीला देण्यात आले होते. परंतु २०१९ मध्ये  कंपनीने यंत्रणा सोडून पळ काढल्याने एक ते दीड वर्ष हे काम बंद होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम पूर्ण करण्यासाठी तीन टप्पे पाडले. औरंगाबाद ते सिल्लोड या पहिल्या टप्प्यातील ६० किमीसाठी पुण्याच्या आर. के चव्हाण, सिल्लोड-अजिंठा (फर्दापूर) या दुसऱ्या टप्प्यातील ४० किमीसाठी आर एस. कामटे, फर्दापूर ते जळगाव तिसऱ्या टप्प्यातील ४८ कि.मी.साठी भटनागर येथील  स्पायरा इन्फ्रा या कंपन्यांकडे  हे काम वर्ग केले.पुण्याच्या आर. के. सी. चव्हाण कन्स्ट्रक्शन या कंपनीने सिल्लोड ते औरंगाबाद  हे काम तीन वर्षापूर्वी सुरू केले. परंतु तरीही या रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे तसेच आहे.

Aurangabad
औरंगाबाद : अबब! 5 हजारांत होणारे भूसंपादन 30 वर्षांत 7 कोटींवर

भविष्यात त्रासदायक 

औरंगाबाद ते जळगाव खान्देश आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात येत असलेला हा सिमेंट-काँक्रीटचा रस्ता चुकीच्या कामांमुळे अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे हा रस्ते सोयीचा कमी आणि गैरसोयींचा अधिक ठरत आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या काही कामांवर राष्ट्रीय महामार्ग विभागातील अभियंत्यांचे 'अर्थपूर्ण ' दुर्लक्ष होत असल्याने निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीने झालेला सिमेंट-काँक्रीट रस्तेबांधणीचे हे काम भविष्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सिमेंट-काँक्रिटीकरण रस्त्यांची बांधणी करताना, कंत्राटदारांच्या कामांवर मात्र अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याचेच या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती पाहता लक्षात येत आहे.

काय आढळले टेंडरनामा पाहणीत

● औरंगाबाद तालुक्यातील हर्सुल टी पॉईट ते वळू संगोपन केंद्रापर्यंत चौपदरी रस्त्याचे काम पुर्ण केले. परंतु; दुभाजकाचे काम केले नाही. रस्त्याच्या बाजूला काॅक्रीट गटारीचे काम केले , पण चेंबरवर ढापे ठेवले नसल्याने खिंडारात पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुढे हर्सुल मारोतीमंदीर ते जुना जकातनाका भूसंपादनाअभावी रूंदीकरणाचे काम रखडलेले आहे. 

● याच मार्गावर हर्सुल ते सावंगी दरम्यान गजानन महाराज मंदिरासमोर अर्धवट कामाने जीवमुठीत धरून एकेरी वाहतूक सुरू आहे. 

●  हर्सुल ते चौकादरम्यान आणि चौका घाट ते बिल्डा घाटातील वळन रस्त्याचे  काम देखील अर्धवट अवस्थेत आहे. यादरम्यान भूसंपादन न केल्याने केवळ दुपदरी रस्ता शिल्लक आहे.

● फुलंब्री गावातून चार वर्षापूर्वी कोट्यावधी रूपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची माती झालेली आहे.

●  गणोरी फाटा ते आळंदपर्यंत झालेल्या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. यात जुन्या ठेकेदाराने केलेल्या कामाला जास्त ठिकाणी तडे गेले आहे. जुन्या ठेकेदाराचे पाप लपवन्यासाठी नवीन ठेकेदाराने आरपार पडलेल्या भेगात डांबरपट्ट्या मारल्याचे दिसून येत आहे. एकुन १४८ मीटर लांबीत रस्ताच्या दोन्ही बाजूला दोन मीटर डांबरी शोल्डरचा अंदाजपत्रकात उल्लेख असताना याकामाला फाटा देण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरावाचे काम देखील केले नसल्याने कांक्रीट रस्त्याच्या खटक्यांमुळे वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. आरकेसी कन्स्ट्रक्शन' या कंपनीकडून भेगा  पडलेल्या  ठिकाणांची कुठेही नव्याने दुरूस्ती केली जात नाहीए.

● पालगाव ते पाथ्री, परसराम बाबा जागृत संस्थान विटखेडा फाटा ते गिरीजा नदीपुलासह पुढे फरशीफाटा ते वडोद - बनकिन्होळा , चिंचखेडा ते भवन साखर कारखान्यापर्यंत अर्धट कामादरम्यान  रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांचे हाल होत आहेत.पुढे अजिंठा ते जळगावपर्यंत जिथे जिथे नदी , नाले आणि ओव्हळ आहेत तिथे तिथे काम अर्धवट असल्याने अशीच स्थिती असल्याचे वाहनधारकांनी सांगितले.

● धक्कादायक म्हणजे जेव्हा डांबरी रस्ते तयार केले जातात तेव्हा पुलावरील भागात काॅक्रीटीकरण केले जाते. मात्र या सिमेंट रस्त्याच्या  पुलांवर डांबरीकरण का केले गेले हा संशोधनाचा विषय आहे.

विभागीय चौकशी करू

या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे देखील आल्या आहेत. सदरील विभागाची बैठक लावून जेथे रस्ता निकृष्ट झाला, तो पुन्हा करण्यासाठी सूचना देऊ. मीही पाठपुरावा करीत असून, चिरा पडलेल्या ठिकाणी नवीन रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सोबत संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणार.

- इम्तियाज जलील , खासदार

खराब भाग काढून घेऊ 

मी या रस्त्यावर जिथे चिरा गेल्या आहेत, त्याची पाहणी करणार आहे व ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे चिरा तडे गेले आहे तो भाग तोडून नवीन करण्यात येईल.

-  पल्लवी सोनवने, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

त्रवस्थ समिती नेमनार 

यासंपूर्ण रस्त्याची चौकशी करण्यात येईल. संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. तीन दिवसात मी स्वतः या रस्त्याची पाहणी करणार आहे. यारस्त्याची त्रयस्थ समितीमार्फत गुणवत्ता तपासली जाईल. 

- आस्तीककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com